कराड सर्कल, डिस्कळचा तलाठी
प्रतिनिधी/ सातारा
जमिनीची खाते फोड नोंद धरून सातबारा उतारा देण्याकरीता 10 हजाराची लाच मागून 5 हजार स्वीकारणारा डिस्कळचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. जय रामदास बर्गे (वय 32, रा.कोरेगाव सुभाष नगर ता. कोरेगाव) असे त्यांचे नाव आहे. तसेच दस्ताची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच कार्यालयातील खाजगी इसम मंगेश गायकवाड याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी मंगेश गायकवाडसह मंडलाधिकारी विनायक पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिलोभापायी हे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत.
लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदाराला जमिनीची खातेफोड नोंद व सातबारा उतारा देण्यासाठी जय बर्गे याने 20 हजारांची मागणी केली होती. त्यातील 10 हजार यापुर्वीच घेतले होते. पुन्हा जय बर्गे 10 हजाराची मागणी करू लागला. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 5 हजार रूपये मागितले. तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे यांची तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत सातारा विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक गणेश ताठे, पोलीस शिपाई निलेश येवले यांनी सोमवारी सापळा लावला. तक्रारदार यांना जय बर्गे याने हे पैसे शेजारील अजय बाळकृष्ण शिपटे यांच्या झेरॉक्स दुकानामध्ये ठेवायला सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी ही रक्कम दुकानाच्या काउंटरवर ठेवली. थोड्या वेळाने जय बर्गे तेथे आला. तो ही रक्कम ताब्यात घेत असताना लाचलुचपत विभागाच्या सापळा पथकाने त्याला रंगेहात पकडले.
मंडलाधिकाऱ्यासह खासगी इसमावर गुन्हा
► कराड : दस्ताची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच कार्यालयातील खाजगी इसम मंगेश गायकवाड याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी मंगेशसह मंडलाधिकारी विनायक पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी ही कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या दस्ताच्या नेंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणी घेऊन तशी नोंद धरून सातबारा उतारा देण्यासाठी 15 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजेडीअंती 10 हजार रूपये देण्याचे ठरले होते.
तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा लावला. यावेळी मंडलाधिकारी विनायक पाटील यांच्या कार्यालयातील खाजगी इसम मंगेश गायकवाड याला 10 हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पोलीस विनायक पाटील यांचा शोध घेत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपअधीक्षक श्रीमती उज्ज्वल अरूण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस नाईक राजपुरे, जाधव यांनी ही कारवाई केली. लाच मागणीची तक्रार असल्यास नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.