कचऱयाची सुलभ विल्हेवाट
भारतातील शहरांमध्ये सर्वात मोठी जर समस्या कोणती असेल तर ती कचऱयाची विल्हेवाट लावणे ही आहे. प्रतिदिन लाखो टन कचरा देशातील शहरांमध्ये साठत असतो आणि त्याची विल्हेवाट वेळेवर न लावल्यास त्याचे डोंगर शहरात ठिकठिकाणी निर्माण झालेले दिसून येता. आता ही समस्या सुलभरीतीने सोडविण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. कानपूरच्या आय आयटीअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कंपनीने एक यंत्र शोधून काढले असून ते कचऱयाची जलद गतीने आणि कमी खर्चात विल्हेवाट लावू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
आयआयटी अंतर्गत असणारी ही स्टार्टअप कंपनी आयआयटीचे विद्यार्थीच चालवितात या विद्यार्थ्यांनी काही माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहाय्याने या यंत्राचा निर्मिती केली आहे. या यंत्रात स्वयंचलित पद्धतीने ओल्या कचऱयाचे कंपोस्ट खतात रुपांतर होते. हे खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱयांचाही फायदा होण्याची शक्यता आहे. या यंत्राला ‘भूमी’ असे नाव देण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा अन्न कचरा किंवा ओल्या कचऱयाचे विघटन करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याची या यंत्राची क्षमता आहे. यामध्ये कार्बन फिल्टर, श्रेडर, एअरपंप, सोलर पॅनेल इत्यादी उपकरणे बसविण्यात आली आहेत. या यंत्रामुळे पर्यावरणाचे संरक्षणही केले जाते. नजीकच्या भविष्यकाळात हे यंत्र कचरा समस्या सोडविण्यासाठी एक वरदान म्हणून सिद्ध होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. जैविक किंवा ओल्या कचऱयाचे प्रमाण एकंदर कचऱयात 60 टक्के असते. त्यामुळे कचऱयाच्या समस्येचे 60 टक्के निवारण तरी हे यंत्र करू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.