कंपनी व्यवस्थापकानेच लुटले मशिनरीसह सुमारे पाच लाख ऐंशी हजारांचे साहित्य
वार्ताहर / पुलाची शिरोली
कंपनी व्यवस्थापकानेच मशिनरीसह कंपनीतील सुमारे पाच लाख ऐंशी हजार रुपयांचे साहित्य लुटले असल्याची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. जी. के. प्रोडक्टचे भागीदार अमित पांडूरंग खांडेकर यांनी याबाबत तक्रार दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी अमित खांडेकर व सागर गायकवाड यांच्या भागिदारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नागाव ( ता. हातकणंगले ) जी. के. प्रोडक्ट कंपनी आहे. या कंपनीत भांडी घासण्याचा चोथा, साबण व पॅकिंग साहित्य तयार होते. गोपाराम जेताराम प्रजापती ( रा. जंगलीबाबा मठाशेजारी, गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर, मुळ रा. पावली, ता. जालोर, जि. भिनमाल राज्य, राजस्थान ) हे तेथे व्यवस्थापक म्हणून काम करत होते.
रविवारी ( ता. २५ ऑक्टोबर ) ला खंडेनवमीनिमित्त कंपनीत पुजा करण्यात आली. सोमवारी साप्ताहिक सुट्टीचा दिवस होता. मंगळवारी ( ता. २७ ) अमित खांडेकर कंपनीत आले असता त्यांना कंपनीच्या दारात ऑईल सांडले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कंपनीचे शटर न उघडता खिडकीतून डोकावून आत पाहिले असता, कंपनीत काहीच साहित्य नव्हते. याबाबत त्यांनी तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलिसात माहिती दिली.
चौकशीत गोपाराम प्रजापती यांनी हे सर्व साहित्य रात्रीच्या वेळी मालवाहतूक वाहनातून भरून नेले असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार अमित खांडेकर यांनी गोपाराम जेताराम प्रजापती यांच्या विरोधात विश्वासघात, फसवणूक व चोरी अशी तक्रार दिली आहे. पॅकिंग मशिन, साबण बॉक्स, तयार चोथा व पॅकिंग साहित्य असे सुमारे पाच लाख ऐंशी हजार रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.