ओळखीचा फायदा घेत घरात घुसला ; महिलेचा विनयभंग करीत केली मुलीला मारहाण
साटेली भेडशीतील युवकाला तडीपारची नोटीस
दोडामार्ग - वार्ताहर
ओळखीचा फायदा घेत रात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग करत तिला तसेच तिच्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या साटेली- भेडशी येथील रेहान लतीफ या युवकाला दोन वर्षांसाठी तडीपारची नोटीस बजावण्यात आली आहे. सावंतवाडीचे प्रांताधिकारी यांनी ही नोटीस बजावली आहे, अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
साटेली - भेडशी थोरले भरड येथील रेहान कमर लतीफ, ( वय २४ ) यास उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांचेकडील हद्दपार आदेशानव्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केले जात आहे. शिवाय हा हद्दपार करण्याचा आदेश दोन वर्षांकरिता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. रेहान लतिफ या युवकास अनेकदा पोलिसांकडून समन्स देण्यात आले होते. शिवाय त्याच्यावर येथील पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर वारंवार कारवाई करून सुद्धा त्याच्या प्रवृत्तीत चांगला बदल होत नव्हता. तसेच तालुक्यात तो गुन्हे करतच होता. त्यामुळे त्याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुकावासियांकडून करण्यात येत होती.या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यातून लतिफवर तडीपार ची कारवाई करण्यात यावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार प्रांताधिकारी सावंतवाडी यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.