‘ओपेनहायमर’ने ऑस्कर सोहळ्यात मारली बाजी
चित्रपटाने पटकाविले 7 ऑस्कर : सिलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता : एमा स्टोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
ऑस्कर 2024 सोहळ्याची सोमवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) दमदार सांगता झाली आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘ओपेनहायमर’ चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने विविध श्रेणींमध्ये 7 ऑस्कर स्वत:च्या नावावर केले आहेत. तर ‘पुअर थिंग्स’ने देखील 4 ऑस्कर पटकाविले आहेत. 96 व्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जिमी किमेल यांनी केले. या सोहळ्यात भारतीयांची निराशा झाली आहे. भारतातून एका माहितीपटाला नामांकन मिळाले होते, परंतु त्याला पुरस्कार मिळू शकलेला नाही.
रॉबर्ट डाउनी ज्युनियर या प्रसिद्ध अभिनेत्याला पहिल्यांदाच ऑस्कर प्राप्त झाला आहे. तर बिली इलिशने 87 वर्षे जुना विक्रम मोडीत काढत सर्वात कमी वयात दोन ऑस्कर पटकावित इतिहास रचला आहे.
नितीन देसाई यांना मानवदंना
ऑस्कर 2024 च्या सोहळ्यात मेमोरियम सेगमेंट देखील पार पडला. यादरम्यान एक व्हिडिओ चालवून अनेक नामी चेहऱ्यांना त्यांच्या कलात्मक वारशासाठी सन्मानित करण्यात आले. यात भारतीय कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे नाव देखील सामील होते. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी दिवंगत देसाई यांना ऑस्कर सोहळ्यादरम्यान मानवंदना देण्यात आली.
क्रिस्टोफर नोलर ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
ओपेनहायमर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर क्रिस्टोफर नोलनने स्वत:च्या नावावर केला आहे. क्रिस्टोफर यांना पहिल्यांदाच ऑस्कर मिळाला आहे. ‘एनाटॉमी ऑफ ए फॉल’चे दिग्दर्शक जस्टिन ट्रीट, ‘किलर्स ऑफ फ्लॉवर मून’चे दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी, ‘पुअर थिंग्स’चे दिग्दर्शक यॉर्गोस लेंथीमॉस आणि ‘द जोन ऑफ इंटरेस्ट’चे जोनाथन ग्लॅजर यांच्यावर मात करत क्रिस्टोफर नोलन यांनी ऑस्कर स्वत:च्या नावावर केला आहे.
‘ओपेनहायमर’ची कहाणी
‘ओपेनहायमर’ एक बायोग्राफी ड्रामा फिल्म आहे. अणुबॉम्बचे जनक जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट ओपेनहायमर यांचे पहिले आण्विक परीक्षण ‘ट्रिनिटी’चा इतिहास मांडणारा आहे. चित्रपटात परीक्षणापूर्वीच्या आणि त्यानंतरच्या घटनांचे रंजक वर्णन आहे. एका व्यक्तीची इच्छा मावनी जीवनाच्या विनाशाचे कारण कसे ठरू शकते हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. तसेच यामुळे बसलेल्या धक्क्याला ओपेनहायमर कसे सामोरे गेले हे देखील चित्रपटात मांडण्यात आले होते.
ऑस्कर पुरस्काराची श्रेणी विजेत्याचे नाव
सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपेनहायमर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एम्मा स्टोन (पुअर थिंग्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी (ओपेनहायमर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन (ओपेनहायमर)
सर्वोत्कृष्ट मूळ गीत व्हॉट वॉज आय मेड फॉर (बार्बी)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिर (ओपेनहायमर)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री डा वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)
सर्वोत्कृष्ट मूळ स्कोर लुडविग गोरानसन (ओपेनहायमर)
सर्वोत्कृष्ट ध्वनी द जोन ऑफ इंटरेस्ट
लाइव्ह अॅक्शन शॉट फिल्म द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर
सर्वोत्कृष्ट सिनमेटोग्राफी ओपेनहायमर
माहितीपट फिचर फिल्म 20 डेज इन मारियुपोल
माहितीपट लघूपट द लास्ट रिपेयर शॉप
सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन ओपेनहायमर
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट गॉडजिला मायनस वन
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट द जोन ऑफ इंटरेस्ट
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाइन पुअर थिंग्स
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन पुअर थिंग्स
मेकअप अँड हेयरस्टायलिंग पुअर थिंग्स
सर्वोत्कृष्ट पटकथा एनाटॉमी ऑफ द फॉल
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपट बॉय अँड द हेरॉन