ऑस्ट्रेलिया - पाक कसोटी उद्यापासून, वॉर्नरवर लक्ष
प्रतिनिधी/ सिडनी
ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानविऊद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुऊवारपासून सुऊवात होत असून यावेळी कसोटी क्रिकेटचा निरोप घेऊ पाहणारा ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर सर्वांचे लक्ष राहील. घरच्या मैदानावर म्हणजे सिडनी क्रिकेट मैदानावरील तिसरी कसोटी येत्या वर्षाच्या सुरुवातीला संपल्यानंतर पाच दिवसांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत या 37 वर्षीय खेळाडूने वर्षाच्या सुऊवातीला दिलेले आहेत.
वॉर्नर हा ऑस्ट्रेलियन संघात एक दशकाहून अधिक काळ महत्त्वाचा खेळाडू राहिलेला असला, तरी त्याची कसोटीतील कामगिरी सध्या चर्चेत आलेली आहे. त्याने 2020 च्या सुऊवातीपासून केवळ एक शतक झळकावले आहे. माजी संघ सहकारी मिचेल जॉन्सनने वॉर्नरला त्याच्या गमनाच्या अटी ठरवू देऊ नयेत, असे मत व्यक्त केले आहे. वॉर्नरच्या कसोटीतील खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्याला एखाद्या नायकासारखा निरोप का दिला जावा, असा सवाल करत माजी वेगवान गोलंदाज जॉन्सनने एका वृत्तपत्रातील स्तंभात लिहिले आहे, ‘का ते कोणी कृपया मला सांगू शकेल का?’.
जॉन्सनने 2018 मधील कुप्रसिद्ध ‘सँडपेपर-गेट’ या बॉल-टेम्परिंग घोटाळ्यातील वॉर्नरच्या महत्त्वपूर्ण सहभागाचा उल्लेख केला आहे. पर्थ येथील पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करताना निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी वॉर्नरचे स्थान निश्चित आहे याला दुजोरा दिला आहे. तथापि, सुऊवातीच्या कसोटीपलीकडे कोणतीही आश्वासने दिलेली नाहीत. त्यामुळे वॉर्नरला त्याच्या अटींनुसार कसोटी कारकीर्द संपवायची असेल आणि सिडनीमध्ये भावनिक निरोप घ्यायचा असेल, तर उल्लेखनीय कामगिरी करून दाखविण्याचा दबाव त्याच्यावर राहणार आहे.
पॅट कमिन्सचा संघ जागतिक कसोटी स्पर्धेचे विजेतेपद राखण्याची आपली मोहीम सुरू करताना पाकिस्तानविरुद्ध निश्चितच त्यांचे पारडे जड मानले जात आहे. यंदा त्यांनी जागतिक कसोटी स्पर्धा जिंकली, अॅशेस राखण्यात यश मिळविले आणि गेल्या महिन्यात एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषकही जिंकला. त्यामुळे यंदाचे वर्ष हे ऑस्ट्रेलियासाठी विजयी वर्ष राहिले आहे. विश्वचषकात वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला. दुसरीकडे, पाकिस्तानला 1956-57 पासून ऑस्ट्रेलियात फक्त चार कसोटी जिंकता आल्या आहेत, त्यांचा शेवटचा विजय 1995 मध्ये सिडनीत नोंदला गेला होता. त्यावेळी त्यांनी 74 धावांनी विजय मिळविला होता. ऑस्ट्रेलियाच्या 12 दौऱ्यांमध्ये पाकिस्तानला कधीही कसोटी मालिका जिंकण्यात यश आलेले नाही.