ऑस्ट्रेलिया आठ वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये यशस्वी
पहिल्या कसोटीत 172 धावांनी दणदणीत विजय : कॅमरुन ग्रीन मॅन ऑफ द मॅच :
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
कॅमरुन ग्रीन व फिरकीपटू नॅथन लियॉनच्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर 172 धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला मायदेशात 8 वर्षांनी पराभूत केले आहे. याआधी कांगारुंनी न्यूझीलंडला त्यांच्याच घरात 2016 साली पराभूत केले होते. फिरकीपटू नॅथन लियॉनने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावामध्ये 6 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कॅमरुन ग्रीनने पहिल्या डावात नाबाद 174 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 34 धावांचे योगदान दिले. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह ऑसी संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. उभय संघातील दुसरा व शेवटचा सामना दि. 8 मार्चपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवण्यात येईल.
वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 383 धावा केल्या होत्या तर न्यूझीलंडचा डाव 179 धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या डावात कांगारुंना 164 धावापर्यंत मजल मारता आली व किवीज संघाला विजयासाठी 369 धावांचे टार्गेट मिळाले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेरीस 3 बाद 111 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या 85 धावांत किवीज संघाने 7 विकेट्स गमावल्या. त्यांचा संपूर्ण संघ 64.1 षटकांत 196 धावांवर ऑलआऊट झाला.
लियॉनच्या फिरकीसमोर किवीज संघाचे लोटांगण
दिवसातील पहिल्या सत्रातच अर्धशतकवीर रचिन रविंद्रला लियॉनने बाद करत ऑस्ट्रेलियाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. रविंद्रने 105 चेंडूत 59 धावा केल्या. यानंतर अनुभवी डॅरिल मिचेलला 38 धावांवर हॅजलवूडने तंबूचा रस्ता दाखवला. ही जोडी बाद झाल्यानंतर इतर किवीज फलंदाज लियॉनच्या भेदक माऱ्यासमोर सपशेल नांगी टाकली. टॉम ब्लंडेल (0), ग्लेन फिलिप्स (1), मॅट हेन्री (14), कर्णधार टीम साऊदी (7) झटपट बाद झाल्याने यजमान न्यूझीलंडचा डाव 196 धावांवर संपला. विशेष म्हणजे, वेलिंग्टनच्या या खेळपट्टीवर फिरकीची जादू पहायला मिळाली. दुसऱ्या दिवसापासूनच खेळपट्टीवर टर्न दिसले. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात 4 विकेट घेणाऱ्या नॅथन लियॉनने दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या. हॅजलवूडने 2 तर हेड व ग्रीनने 1 बळी घेतला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या किवीज संघाला तब्बल 172 धावांनी हार पत्करावी लागली.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 383 व दुसरा डाव 164
न्यूझीलंड प.डाव 179 व दु.डाव सर्वबाद 196 (रचिन रविंद्र 59, डॅरिल मिचेल 38, हेन्री 14, साऊदी 7, लियॉन 65 धावांत 6 बळी, हॅजलवूड 2 बळी).
फिरकीपटू लियॉनने मोडला 18 वर्षाचा विक्रम
ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लियॉनने न्यूझीलंडविरुद्ध दोन्ही डावात मिळून 10 बळी घेतले. या कामगिरीसह लियॉन हा न्यूझीलंडच्या भुमीवर एका कसोटीत 10 बळी घेणारा दहावा गोलंदाज ठरला आहे. 2006 नंतर पहिल्यांदाच एखाद्या फिरकी गोलंदाजाने न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. 2006 मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात डॅनियल व्हिटोरी आणि मुथय्या मुरलीधरन यांनी प्रत्येकी 10 विकेट घेतल्या होत्या. आता 18 वर्षांनंतर नॅथन लायनने न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया नंबर वन!
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. या पराभवामुळे न्यूझीलंडच्या विजयाची टक्केवारी 60 टक्के झाली आहे. भारतीय संघाचे 64.58 गुणासह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्यांचे 59.09 टक्के गुण आहेत. दरम्यान, भारताला आता 7 मार्चपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. हा विजय मिळवून संघ आपले अव्वल स्थान मजबूत करू शकतो.