उमेश यादव, हर्षल पटेल, शार्दुल ठाकुर सर्वोच्च आरंभ बोलीच्या गटात
आयपीएल लिलाव’ : 77 जागांच्या शर्यतीत 333 खेळाडू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवसह वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि शार्दुल ठाकूर हे तीन असे भारतीय खेळाडू आहेत ज्यांना ‘आयपीएल’साठी 2 कोटी रुपयांची सर्वोच्च आरंभ बोली लाभलेली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार असून यावेळी 77 जागांचा निकाल लागणार आहे. त्याकरिता 333 खेळाडू शर्यतीत राहणार आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लिलावात हर्षलला 10.75 कोटी रु. मोजून करारबद्ध करण्यात आले होते. ‘आयपीएल’च्या एका शानदार हंगामानंतर त्याला राष्ट्रीय संघातही स्थान मिळाले होते.
आयपीएल कार्यकारी मंडळाने सर्व संघांना 1166 खेळाडूंची यादी दिली होती आणि सर्व संघांनी त्यांच्या इच्छेनुसार यादी दिल्यानंतर खेळाडूंची संख्या 333 पर्यंत कमी करण्यात आली. त्यापैकी 214 भारतीय आणि 119 परदेशी खेळाडू, तर दोन सहयोगी राष्ट्रांचे खेळाडू आहेत. या लिलावात 10 संघ एकत्रितपणे 262.95 कोटी ऊ. खर्च करू शकतील. उपलब्ध 77 जागांपैकी 30 जागा परदेशातील खेळाडूंसाठी निश्चित केलेल्या आहेत आणि जरी विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, यष्टिरक्षक जोस इंग्लिस, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हे सर्व 2 कोटी ऊपयांच्या गटात असले, तरी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पुन्हा एकदा जास्त मागणी असेल.
न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. त्याची आरंभ बोली 50 लाख ऊपयांची आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेन हे लक्ष वेधून घेऊ शकतात. इंग्लंडचा फारसा परिचयाचा नसलेला यष्टिरक्षक फलंदाज टॉम-कोहलर कॅडमोर यालाही मागणी येऊ शकते. त्याची आरंभ बोली 40 लाख रु. आहे आणि ‘टी20’ लीगमधील फटकेबाजीसाठी तो ओळखला जातो. 1.5 कोटींच्या आरंभ बोलीसह श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा परत आलेला असून तो आणि विश्वचषकातील त्याचा संघ सहकारी दिलशान मदुशंका यांनाही मागणी राहू शकते.