उपजिल्हा रुग्णालयात गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया
कणकवली:
कठीण समजल्या जाणाऱया गुदद्वाराच्या (रेक्टोपॅक्सी) दोन शस्त्रक्रिया कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नुकत्याच करण्यात आल्या. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून या रुग्णांना लवकरच ‘डिस्चार्ज’ देण्यात येणार आहे. वैद्यकीय अधीक्षक तथा सर्जन डॉ. सहदेव पाटील यांनी भूलतज्ञ डॉ. मनीषा ओगले यांच्या साथीने या शस्त्रक्रिया केल्या.
मुटाट (ता. देवगड) येथील 66 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती 23 मे रोजी रुग्णालयात आली होती. शौच करताना त्याचे गुदद्वार जवळपास अर्धा फूट बाहेर येत होते. त्यातच दुखतही असल्याने तो शौचास बसण्यासही घाबरत होता. परिणामी जेवणही बंद झाल्याने त्याच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाणही कमी झाले होते. शरीरातील पाणीही कमी झाले. त्याला हृदय, फुफ्फुसाचा त्रासही जाणवत होता. परिणामी डॉ. पाटील यांना सलग दहा दिवस उपचार करून त्याला शस्त्रक्रियेसाठी ‘फिट’ करावे लागले. पण, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने ज्येष्ठाचे कुटुंबियही घाबरले होते. मात्र, डॉ. पाटील यांनी धीर दिला आणि दहा दिवसांपूर्वी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
तळेरे येथील 95 वर्षीय वृद्धेवरही अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, वयस्कर व त्यातही प्रचंड अशक्त असल्याने तिला भूल देणेही शक्य नव्हते. मात्र, डॉ. ओगले यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत, विशिष्ठ प्रकारची भूल दिल्यानंतर ही शस्त्रक्रिया पार पडली. तिचीही प्रकृती स्थिर आहे. या दोन्ही रुग्णांना लवकरच ‘डिस्चार्ज’ देण्यात येणार असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.
अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया प्रचंड गुंतागुंतीच्या असतात. ‘लॅप्रॉटॉमी’ करून (पोट उघडून) ही शस्त्रक्रिया करावी लागते, असे डॉ. पाटील म्हणाले. डॉ. मनीषा ओगले या एनआरएचएम अंतर्गत जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. आठवडय़ातील दोन दिवस त्या कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे डय़ुटी बजावतात. या शस्त्रक्रिया करताना पाटील, ओगले यांना डॉ. सतीश टाक, नर्स चित्ररेखा तेली, समीक्षा पाटकर, एस. एस. डोंगरे आदींचे सहकार्य लाभले.