उत्तर प्रदेशसह प्रत्येक राज्यात भाजप यशस्वी होणार
पंतप्रधान मोदी यांचा वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आत्मविश्वास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशसह सर्व 5 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांचाच विजय होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेला बुधवारी मुलाखत देत होते. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर त्यांची मते व्यक्त केली.उत्तर प्रदेशात मतदानाचा प्रथम टप्पा आज गुरुवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या प्रदीर्घ मुलाखतीला राजकीय वर्तुळात महत्व देण्यात येत आहे.
या मुलाखतीत त्यांनी भाजपच्या इतिहासाचाही परामर्ष घेतला. जनसंघाच्या काळात आणि नंतर भाजपची 1980 मध्ये स्थापना झाल्यानंतरही पक्षाला सातत्याने अपयश येत होते. आता मात्र परिस्थितीत पूर्णतः परिवर्तन झाले आहे. जनसंघाच्या काळात तर अशी स्थिती होती की उमेदवाराची अनामत रक्कम वाचली तरी कार्यकर्ते पेढे वाटत असत. अशा अवस्थेतून कष्टाने वाटचाल करत भाजप आज भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
नेहरु परिवाराचा उल्लेख
लोकसभा आणि राज्यसभा येथे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान मोदी यांनी प्रदीर्घ उत्तर दिले होते. या उत्तरात त्यांनी नेहरु परिवाराचा उल्लेख केल्याने काँगेस नाराज आहे. तथापि, आपण कोणाच्याही पणजोबा, आजोबा, आजी, आई-वडील यांचा उल्लेख केला नव्हता. केवळ भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी कोणत्या प्रसंगी काय म्हटले आहे, हे स्पष्ट पेले होते. त्यामुळे कोणालाही मिरच्या झोंबण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
घराणेशाही धोकादायकच
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेसाठी घराणेशाही आणि परिवारवाद धोकादायकच असतो. बनावट समाजवादाचेच नाव परिवारवाद असे आहे. उत्तर प्रदेशातील सप हा पक्ष बनावट समाजवादी आहे. हा पक्षच परिवारवादी आहे. हा पक्ष चालविणारे एकाच परिवारातील अनेक सदस्य निवडणुकीला उभे राहतात. पिता कामाचा राहिला नाही की मुलगा पक्षाचा अध्यक्ष होतो. मुलगा थकला की त्याचा मुलगा अध्यक्ष होतो. कार्यकर्त्यांसाठी पक्षाचे सर्वोच्च पद कधीच रिकामे नसते. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, आदी अनेक राज्यांमध्ये आपल्याला समाजवादी म्हणवून घेणाऱया पक्षांची ही स्थिती झालेली दिसून येईल. पुढची पिढी कशीही असो, पक्षाचे अध्यक्षस्थान आणि महत्वाची पदे या पिढीतील लोकांनाच मिळणार अशी व्यवस्था लोकशाहीची शत्रू आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
काँगेसमुळेच भ्रष्टाचाराला राजमान्यता
काँगेस आज नगण्य पक्ष झाला आहे, मग आपण भाषणांमध्ये त्या पक्षावरच शरसंधान अधिक वेळ का करता, या प्रश्नाला त्यांनी सविस्तर उत्तर दिले. देशावर सर्वाधिक काळ काँगेसची सत्ता राहिली आहे. त्यामुळे देशाची आज जी स्थिती आहे, तिला काँगेस आणि त्या पक्षाची विचारसरणी सर्वाधिक जबाबदार आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि माझा अपवाद वगळता भारताचे आजवरचे सर्व पंतप्रधान याच विचारसरणीचे होते. सांप्रदायवाद, भाषावाद, जातीयवाद, प्रांतवाद, नातेवाईकबाजी आणि भ्रष्टाचार हे सर्व दुर्गुण भारतीय व्यवस्थेत स्थिरावण्यासाठी काँगेसची विचारधार आणि कार्यशैलीच सर्वाधिक कारणीभूत आहे. ही वस्तुस्थिती देशासमोर स्पष्ट करावी लागते, अशा शब्दांमध्ये त्यांनी या टीकेचे समर्थन केले.
भाजपमधील घराणेशाही
घराणेशाही भाजपमध्येही आहे या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. एखाद्या कुंटुंबातील एक दोन सदस्य पक्षात असणे आणि त्यांना उमेदवारी दिली जाणे हे एखादा पक्षच एका कुटुंबाच्या ताब्यात असण्यापेक्षा भिन्न आहे. विशेषतः तरुणांना जर राजकारणात कर्तृत्व गाजवयाचे असेल तर त्यांच्यासमोर भाजप हाच पर्याय आहे. कारण त्यांनी कितीही चांगले कार्य केले तरी इतर पक्षांमध्ये विशिष्ट पातळीपेक्षा जास्त ते प्रगती करु शकत नाहीत. उलट भाजपमध्ये त्यांच्यापैकी कोणालाही सर्वोच्च पातळीपर्यंही जाता येते. ही स्थिती लोकशाहीसाठी सर्वाधिक अनुकूल असते अशीही कारणमीमांसा पंतप्रधान मोदींनी केली. राम मनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस आणि नितीशकुमार हे खरे समाजवादी होते, इतर अनेक नेते केवळ सांगण्यापुरते समाजवादी असल्याचा आरोप केला.
फुटीरतावाद रोखणे आवश्यक
फुटीरतावाद भारतीयांच्या रक्तात नाही. क्षेत्रीय महत्वाकांक्षांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सामाजिक न्यायाच्या तत्वात कोणतेही परिवर्तन करता कामा नये. या संबंधात आज केंद्र सरकारला एक राज्य सोडून सर्वांचा सहयोग मिळत आहे. पश्चिम बंगाल राज्याचे नाव न घेता त्यांनी हा आरोप केला.
लखीमपूर खेरी प्रकरणी उत्तर
शेतकऱयांना कारखाली चिरडण्याचा प्रकार लखीमपूर खेरी येथे घडला. मात्र, भाजप सरकारने त्वरित कारवाइं केली. सर्वोच्च न्यायालयाला सहकार्य केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. विरोधी पक्षांनी यावर राजकारण करुन स्थिती बिघडविण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारने संयम राखून योग्य ती कारवाई केली. त्यामुळे विरोधकांचे मनसुबे उद्धवस्त झाले, असे विधान त्यांनी केले.
राज्यांनाही महत्व
भारताच्या राज्यव्यवस्थेत राज्यांना मोठे महत्व आहे. आपण स्वतः 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जबाबदारीची आपल्याला जाणीव आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी अनेक विषयांवर नेहमी बोलतो. कोरोना कालखंडात अनेकदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही, विशेषतः विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनीही सहकार्य करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी बोलत नाही, हा आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ईडी, सीबीआय धाडी
भ्रष्टाचार वाळवीप्रमाणे देशाला पोखरत आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई करावीच लागते. काळ निवडणुकीचा असो किंवा नसो, भ्रष्टाचार सर्वत्र आणि सदासर्वकाळ चालतो. ही स्थिती अशीच राहू दिल्यास अर्थव्यवस्थाच धोक्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी धाडी टाकल्या जातात या आरोपा काहीही अर्थ नाही, ही सरकारची भूमिका पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केली.
कृषी कायदे हिताचेच होते
सरकारला नेहमी छोटय़ा शेतकऱयांविषयी आस्था वाटत आली आहे. त्यांच्या हितासाठीच कृषी कायदे करण्यात आले होते. मात्र, परिस्थिती वेगळी झाली तेव्हा कायदे मागे घेण्यात आले. ते मागे घेण्यात येत असतानाही ते हिताचेच असल्याचे आम्ही स्पष्ट केले होते. कायदे मागे घ्यावे लागले असले तरी शेतकऱयांच्या हिताचे कामे आम्ही करतच राहणार आहोत, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
लॉकडाऊनचा निर्णय योग्यच
अचानक लॉकडाऊनचा निर्णय योग्यच होता. स्थलांतरित कामगारांनाही आहे तेथेच रहा असे सांगण्यात आले होते. तेथे त्यांच्या योगक्षेमाची व्यवस्थाही करण्यात येणार होती. तथापि, काँगेसने त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्याची तिकिटे वाटून त्यांच्या मनात भीती निर्माण केली. त्यामुळे कामगार भ्रमित होऊन त्यांनी मोठय़ा प्रमाणावर गावी जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी व्यवस्थेवर ताण पडला. आपत्तीतही राजकारण करण्याची काँगेसची ही निती देशाला महाग पडली. याचा जाब लोक तिला विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असेही विधान त्यांनी केले.
भाजपची आर्थिक नीती व्यवहार्य
आर्थिक लाभ गरीबांपर्यंत पोहचविणे, त्यांना आरोग्य, शिक्षण, अन्न सुरक्षा आणि स्वच्छता सोयी पुरविणे हे आमचे ध्येय आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भरतेच्या मार्गाने देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढविणे हे धोरणही क्रियान्वित केले आहे. अशा प्रकारे संपत्ती निर्माण करणे आणि तिचा लाभ गरीबांपर्यंत पोहचविणे अशा दोन्ही मार्गांनी आमच्या आर्थिक धोरणाचा प्रवास सुरु आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.