For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईश्वराची प्राप्ती करून घेणारा कायम सुखात राहू शकतो

08:19 PM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईश्वराची प्राप्ती करून घेणारा कायम सुखात राहू शकतो
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

बाप्पा म्हणाले, इंद्रियजय मिळवलेला साधक षड्रिपुना त्याच्या गरजेनुसार वापरत असतो. त्याची सद्गुरूंवर अत्यंत निष्ठा असते. त्यांच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करत तो पुढे जात असतो. अशा साधकाला अंतरनिष्ठ असं म्हणतात त्याला अंतरीचा प्रकाश दिसू लागतो. तो संपूर्णत: संशयरहीत असल्याने संपूर्ण समाधानी असतो. सर्वजण त्याला ईश्वररूपातच दिसत असल्याने त्याला त्यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटत असते. त्या प्रेमापोटी लोकसंग्रह करून त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणे हे लोककल्याणकारी कार्य तो निरपेक्षतेनं करत असतो. तो स्वत:ला कर्ता समजत नसल्यामुळे मी अमुक एव्हढं काम करीन, तमुक लोकांना तयार करीन असं कोणतंही उद्दिष्ट त्यानं ठेवलेलं नसतं. जशी ईश्वरी इच्छा असेल तेव्हढं कार्य पूर्ण होईल हे तो जाणून असतो. त्यामुळे ईश्वरी प्रेरणेनुसार कार्य करून आयुष्य व्यतीत केल्यावर शेवटी त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते. इच्छा, द्वेष, सुख, दु:ख आणि अहंकार हे विकार माणसाला जन्मापासून चिकटलेले असतात. त्यांचा प्रभाव कमी करण्याची सुरवात षड्रिपूंच्यावर विजय मिळवून होते असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

जेतारऽ षड्रिपूणां ये शमिनो दमिनस्तथा ।

Advertisement

तेषां समन्ततो ब्रह्म स्वात्मज्ञानां विभात्यहो ।। 25 ।।

अर्थ- षड्रिपूंना जिंकणाऱ्या, शम व दम यांनी युक्त असलेल्या अशा आत्मज्ञानी मनुष्यांच्या भोवती सर्वत्र ब्रह्म प्रकाशते.

विवरण- मनुष्याला देहाच्या माध्यमातून सुख मिळवण्याची पहिल्यापासूनच गोडी लागलेली असते आणि ते सुख मिळवण्यासाठी त्याची सतत धडपड चालू असते पण वस्तूतून मिळणारे सुख, ती वस्तू नष्ट झाल्यावर संपते. म्हणून न संपणारे सुख मिळवण्यासाठी नष्ट न होणारी वस्तू मिळाली पाहिजे. कायम टिकणाऱ्या वस्तूला नित्य असं म्हणतात. जगात अशी कायम टिकणारी वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे परमेश्वर. त्याची प्राप्ती करून घेणारा कायम सुखात राहू शकतो. हे लक्षात आलेला मनुष्य त्यादृष्टीने प्रयत्न करू लागतो. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. एकदा एखादी गोष्ट हवी म्हणजे हवी असं ठरवलं की, ते त्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्याच्या मागे लागतं. मग इतर सर्व गोष्टी त्याच्यादृष्टीने गौण ठरतात. जो नित्य वस्तूच्या म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या मागे लागला आहे त्याच्यातही षड्रिपु असतात पण तो त्याच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी त्यांचा वापर करतो. षड्रिपूना चांगल्या गोष्टीसाठी कसं वापरायचं हे संत आपल्याला समजवून सांगतात. संतांच्या सांगण्यानुसार तो वासना ईश्वराकडे वळवतो. ईश्वराचा मोह धरतो. त्यातून त्याला दीर्घकाळ त्याची प्राप्ती झाली नाही की, त्याला ईश्वरप्राप्तीचा लोभ सुटतो. त्यात तो कुठं कमी पडू लागला की, त्याला स्वत:चाच राग येतो. एखाद्या दिवशी साधना झाली नाही तर त्याला वाईट वाटतं. अशा पद्धतीने तो षड्रिपूंना स्वत:च्या हितासाठी वापरतो. म्हणून ते त्याला बाधत नाहीत. उलट त्यांना काबूत ठेऊन तो त्यांच्यावर विजय मिळवून राज्य करतो. त्याला इतर काही मिळवण्याची इच्छा होत नसते. त्यामुळे त्याबद्दल मोह होणे, लोभ सुटणे, मिळत नसल्यास राग येणे या गोष्टी त्याच्याबाबतीत संभवत नाहीत. त्यामुळे त्याला कुणाचा राग येत नाही की, कुणाचा मत्सर वाटत नाही. त्याला सर्वजण सारखेच असतात. हा आपला तो परका असं न वाटता त्याला सर्व ईश्वररूप दिसत असतात. त्याचाच परिणाम म्हणून नामदेव महाराज कुत्र्याने नैवेद्याच्या ताटातली पोळी पळवल्यावर तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे धावतात. एकनाथ महाराज काशीहून आणलेली व रामेश्वराकडे नेत असलेली गंगेची घागर उन्हामुळे तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाच्या तोंडात रीती करतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.