For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईव्हीएम मशीन आणि मतदान साहित्य केंद्रावर पोहोच करण्याची लगबग

11:22 AM May 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
ईव्हीएम मशीन आणि मतदान साहित्य केंद्रावर पोहोच करण्याची लगबग
Advertisement

शहरातील तीन केंद्रावरुन मतपेटी संकलन केंद्रावरुन साहित्य मतदान केंद्रावर रवाना

कोल्हापूर प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीसाठी आज ( 7 मे ) कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.सोमवारी सकाळी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन आणि अन्य साहित्य पोहोचवण्याची प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर शहरातील तीन ठिकाणाहून ईव्हीएम मशीन आणि साहित्याचे संबंधित कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले. हे साहित्य घेऊन जाण्यासाठी वितरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती.

Advertisement

देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव सुरु झाला आहे. 16 मार्च 2024 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झाली. देशातील विविध राज्यात काही टप्यामध्ये हे मतदानाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज (7 मे ) तिसऱ्या टप्यात मतदान होत आहे.मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गेले दीड महिना नियोजनाचे काम सुरु होते.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 2 हजार 156 आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 1 हजार 830 मतदान केंद्रे आहेत. यामध्ये सांगली जिह्यातील इस्लामपूरला 284 आणि शिराळा येथील 334 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघामध्ये एकूण 4 हजार 312 बॅलेट युनिट तर 2 हजार 156 व्हीव्हीपॅट मशीन असून, 938 बॅलेट युनिट आणि 802 व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले आहेत.

Advertisement

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण 3 हजार 660 बॅलेट युनिट आणि 1 हजार 830 व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय येथे एकूण 779 बॅलेट युनिट आणि 681 व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले आहेत.

सोमवारी मतपेट्या आणि साहित्याचे वितरण करण्यात आले. राजारामपुरीतील व्ही.टी.पाटील भवन,लाईन बाजार येथील महासैनिक प्रशिक्षण हॉल आणि स्वामी विवेकानंद कॉलेज येथून साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेतील सहभागी शासकीय, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांची मोठी गर्दी झाली होती. मंडप घालून विधानसभा मतदारसंघनिहाय कक्ष स्थापन करण्यात आले होते. साहित्य घेऊन तिथून कोणत्या मततदान केंद्रावर जायचे आहे हे सांगितले जात होते. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी बाहेर मोठा फलक लावून त्यावर कोणत्या मतदान केंद्रावर कोणते वाहन जाणार आहे त्या वाहनाचा क्रमांक, चालक, संबंधित अधिकारी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला.यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना फारशी यातायात करावी लागली नाही.

चहा-नाष्टा जेवणाची सोय
निवडणूकीच्या प्रक्रियेत हजारो अधिकारी,कर्मचारी सहभागी झाले आहेत.यामुळे ईव्हीएम मशीन आणि मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी सोमवारी सकाळी सात वाजता कर्मचारी दाखल झाले. या सर्व कर्मचाऱ्यांची चहा-नाष्टा,जेवणाची सोय करण्यात आली होती.

पार्किंगचे योग्य नियोजन
मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी एसटी, केएमटी आणि खासगी बसेस घेण्यात आल्या आहेत.तसेच या केंद्रावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने येणार याची दक्षता घेऊन तीनही केंद्रांच्या ठिकाणी वाहतूकीचे नियोजन करण्यात आले होते.यामुळे शहरात कुठेही वाहतूक विस्कळित झाली नाही.

Advertisement

.