For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायलने घेतला इराणचा बदला

06:09 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रायलने घेतला इराणचा बदला
Advertisement

100 क्षेपणास्त्रांसह प्रतिहल्ला : क्षेपणास्त्र कारखाने-लष्करी तळ लक्ष्य : 20 तळ नष्ट : 2 जवान हुतात्मा

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा 25 दिवसांनंतर इस्रायलने बदला घेतला. शनिवार, 26 ऑक्टोबरला सकाळी 100 इस्रायली लढाऊ विमानांनी इराणच्या 20 लष्करी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांवर हल्ला केला आहे. इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने तेहरान, खुझेस्तान आणि इलाम राज्यात इस्रायली हल्ल्यांना तोंड दिले आहे. या हल्ल्यात मर्यादित नुकसान झाल्याचा दावा इराणने केला असला तरी जागतिकदृष्ट्या या प्रतिहल्ल्याला ‘बदला’ असे संबोधले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात दोन सैनिक हुतात्मा झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

इराणच्या लष्करी तळावर अचूक हल्ले करण्यासाठी इस्रायलने आपल्या उच्चस्तरीय लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला. हा हल्ला तीन टप्प्यात करण्यात आला. इस्रायलने हल्ल्यासाठी पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचा वापर केला. इस्रायलने रॅम्पेज आणि रॉक्स क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला चढवल्याने इराणही हादरून गेला असून प्रतिहल्ला न करण्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याचे समजते. तेहरानच्या ‘इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळा’जवळही हल्ला झाला. स्थानिक वेळेनुसार पहाटे 2:15 वाजता हल्ले सुरू झाले आणि पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहिले. जेऊसलेम पोस्टनुसार इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी 100 हून अधिक लढाऊ विमानांचा वापर केला. हल्ल्यात एफ-35 चाही वापर करण्यात आला. सुरुवातीला इस्रायलने सीरियातील रडार लक्ष्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणमधील हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडारवर हल्ला करण्यात आला. इस्रायलने या मोहिमेला ‘ऑपरेशन डेज ऑफ रिपेंटेंस’ असे नाव दिले आहे. ज्याचा अर्थ हिब्रूमध्ये ‘पश्चात्तापाचे दिवस’ असा होतो.

या घटनेबाबत इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये हमास, हिजबुल्लाह हे इराणचे समर्थक 7 ऑक्टोबर 2023 पासून आमच्यावर सातत्याने हल्ले करत आहेत. तसेच अलीकडच्या काळात थेट इराणमधूनही हल्ले झाल्यामुळे आम्हालाही प्रतिसाद देण्याचा अधिकार आणि कर्तव्य असल्याच्या दावा करण्यात आला आहे.

आमचा बदला पूर्ण झाला!

आयडीएफचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, इस्रायल संरक्षण दलांनी आपली मोहीम फत्ते केली आहे. आमचा संदेश स्पष्ट आहे की जे आम्हाला धमक्मया देतात किंवा आम्हाला चालू असलेल्या संघर्षात ओढण्याचा प्रयत्न करतात त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही जे काही आवश्यक असेल ते करू. अशाप्रकारे आमचे मिशनही पूर्ण झाले आहे. तथापि, त्यांनी इराणकडून पुन्हा हल्ल्याच्या विरोधात संभाव्य प्रत्युत्तर कारवाईचा इशाराही दिला.

इस्रायलची जोरदार मुसंडी

अलीकडच्या काळात इस्रायल केवळ गाझाच नाही तर लेबनॉनवरही हल्ले करत आहे. या काळात त्याने हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह, हमासचे नेते सिनवार आणि हसन सैफुद्दीन यांचीही हत्या केली आहे. या धक्क्याने इराण हादरला आहे. या कारणास्तव त्यांनी 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 200 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. तेव्हापासून इस्रायल इराण आणि त्याच्या मित्रराष्ट्रांवर सतत कहर करत आहे. आता इराणला दिलेल्या प्रत्युत्तरात 3 तासांत 20 लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले. यामध्ये क्षेपणास्त्र कारखाने आणि लष्करी तळांचा समावेश आहे.

हवाई वाहतुकीवर परिणाम

इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायल, इराण आणि इराकने आपली हवाई हद्द बंद केली आहे. हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्रायलचे समर्थन करत इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले आहे. इराणने या हल्ल्याला दुजोरा देत तेहरान, खुझेस्तान आणि इलाम राज्यांमध्ये हे हल्ले झाल्याचे सांगितले. यापैकी बरेच हल्ले हवेत रोखले गेल्यामुळे फारसे नुकसान झाले नाही.

इराणवरील हल्ल्याचा सौदीकडून निषेध

सौदी अरेबियाने इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार सौदीने याला ‘सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन’ म्हटले आहे. मात्र, सौदी अरेबियाने या वक्तव्यात इस्रायलचे नाव घेतलेले नाही. सौदीने सर्व पक्षांना शक्मय ते सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन करत आंतरराष्ट्रीय समुदायाला संघर्ष संपवण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले आहे.

इस्रायलला स्वत:च्या बचावाचा अधिकार : अमेरिका

इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन प्रशासनाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, इस्रायलला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार आहे. परंतु राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणची आण्विक केंद्रे आणि तेल साठ्यांना लक्ष्य करण्याचे समर्थन करणार नाहीत. कारण यामुळे मध्यपूर्वेत संघर्ष आणखी वाढू शकतो. याआधीही अमेरिकेने इस्रायलला या ठिकाणांवर हल्ले न करण्याचा सल्ला दिला आहे.

हल्ल्यानंतर लढाऊ विमाने सुखरूप परतली

आयडीएफने इराणवर केलेल्या हल्ल्याची माहिती जारी केली. हा हल्ला लढाऊ विमाने आणि गुप्तचर विमानांच्या मदतीने 1,600 किमी अंतरावर झाला. हे हल्ले अनेक टप्प्यांत झाले. हल्ल्यानंतर इस्रायलची विमाने सुखरूप परतली. या ऑपरेशनला ‘डे ऑफ रेग्रेट’ असे नाव देण्यात आले. हे हल्ले इराणचे लष्करी तळ, हवाई संरक्षण केंद्र आणि बॅलिस्टिक मिसाईल साइट्सवर करण्यात आले. 1 ऑक्टोबर आणि 14 एप्रिल रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांसाठी याच ठिकाणांचा वापर करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.