आशिष मिश्राच्या जामिनाला आव्हान
कुशीनगर / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा पुत्र आशिष मिश्रा याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने मिश्रा यांचा जामीन रद्द करण्याची आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. सुमारे 4 महिने तुरुंगात असलेला आशिष मिश्रा अलीकडेच जामिनावर सुटला आहे.
वकील शिवकुमार त्रिपाठी आणि सी. एस. पांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश अनुमानावर आधारित असल्याचे अर्जात म्हटले आहे. जामिनावर सुटलेला संशयित आरोपी पुराव्याशी छेडछाड करू शकतो. तसेच साक्षीदार, शेतकरी आणि पीडित कुटुंबांनाही धोका आहे. याप्रकरणी एसआयटीला तातडीने सर्वोच्च न्यायालयात स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले पाहिजे. तसेच उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारला तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, असे विविध मुद्दे याचिकेमध्ये मांडण्यात आले आहेत.