आशा-अपेक्षा दर्शविणारे छायाचित्र
गंगाकाठावर ‘स्पर्धा परीक्षां’ची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांचे छायाचित्र व्हायरल
उद्योजक हर्ष गोयंका सोशल मीडियाच्या जगतात अत्यंत लोकप्रिय आहेत. आनंद महिंद्रा यांच्याप्रमाणे त्यांचे ट्विट्स देखील लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. अलिकडेच त्यांनी एक छायाचित्र शेअर करत ते पाटण्यातील गंगेच्या काठावरील असल्याचे म्हटले आहे. या छायाचित्रात मोठय़ा संख्येत विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसून आले आहेत. गोयंका यांना ट्विटरवर 17 लाखाहून अधिक युजर्स फॉलो करतात.
हर्ष गोयंका यांनी हे छायाचित्र 4 एप्रिल रोजी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केले होते. ‘बिहारच्या पाटण्यात मुले गंगा नदीच्या काठावर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. हे आशा-अपेक्षा आणि स्वप्नांचे छायाचित्र आहे’’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. गोयंका यांच्या या ट्विटला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लाइक्स आणि 500 हून अधिक रीट्विट्स मिळाले आहेत.
नॉलेज हब आहे बिहार
गंगा काठावर मोठय़ा संख्येत विद्यार्थी पुस्तके घेऊन अभ्यास करत असल्याचे छायाचित्रात दिसून येते. परंतु हे छायाचित्र कधी काढले गेले याची माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही. परंतु हे छायाचित्र पाहून युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी हा शिक्षणाबद्दलचा ध्यास असल्याचे म्हटले आहे. तर बिहारमधूनच सर्वाधिक आयएएस, आयपीएस अधिकारी होत असल्याचे काही जणांनी नमूद केले आहे. तर अनेक युजर्सनी या विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना केली आहे.