आर. हरी कुमार नवे नौदलप्रमुख
30 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार
नवी दिल्ली ः व्हॉईस ऍडमिरल आर. हरी कुमार यांची नवे नौदलप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. नौदलाचे सध्याचे प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह 30 नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्याच दिवशी व्हॉईस ऍडमिरल आर. हरी कुमार हे पदभार स्वीकारणार आहेत. त्यांनी आतापर्यंत व्हॉईस ऑफ डिफेन्स स्टाफ, चीफ ऑफ पर्सनल, द फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लीट या पदांवर काम केले आहे. तसेच नेव्हल वॉर कॉलेज गोवाच्या कमांडंटपदाची जबाबदारीही त्यांनी पेलली आहे. आयएनएस रंजित या युद्धनौकेवर तोफखानाप्रमुख आणि आयएनएस विराट युद्धनौकेवरही त्यांनी सेवा बजावली आहे.
व्हॉईस ऍडमिरल आर. हरी कुमार यांचा जन्म 12 एप्रिल 1962 रोजी केरळमधील त्रिवेंद्रम या ठिकाणी झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी डिफेन्स अन्ड स्ट्रटेजिक स्टडिज या विषयातून त्यांनी एमफिल केले आहे. त्यानंतर त्यांनी त्रिवेंद्रमच्या गव्हर्नमेन्ट आर्ट्स कॉलेजमधून प्रि डीग्री कोर्स पूर्ण केला. व्हॉईस ऍडमिरल आर. हरी कुमार यांना आतापर्यंत परम विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल या बहुमूल्य मेडल्ससह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.