आयर्लंडच्या विजयात स्टर्लिंगचे शतक
लंडन : पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱया सामन्यात पॉल स्टर्लिंगच्या नाबाद शतकाच्या जोरावर आयर्लंडने झिम्बाब्वेचा 40 धावांनी पराभव करून मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळविली आहे.
या सामन्यात आयर्लंडचा सलामीचा फलंदाज पॉल स्टर्लिंगने नाबाद 115 धावा झोडपल्या. टी-20 प्रकारातील स्टर्लिंगचे हे पहिले शतक आहे. स्टर्लिंगने 75 चेंडूत 8 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 115 धावांची खेळी केली. या सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेला 138 धावांत गुंडाळले. स्टर्लिंगने पहिले अर्धशतक 50 चेंडूत झळकवले. त्यानंतर त्याने 23 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टी-20 प्रकारात आयर्लंडतर्फे शतक झळकविणारा स्टर्लिंग हा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनने या क्रीडा प्रकारात शतक झळकविले होते. झिम्बाब्वेच्या डावात आयर्लंडच्या मार्क ऍडेरने 11 धावांत 3 गडी बाद केले. आयर्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वे संघाचा डाव 18.2 षटकात संपुष्टात आला.