आगीच्या वाढत्या घटना टाळणे गरजेचे
अग्निशमन दल, वन खात्याने सावध राहणे आवश्यक : 15 दिवसांत पाच गवतगंजींना आग लागून नुकसान
प्रतिनिधी / बेळगाव
वाढत्या उष्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आग, शॉर्टसर्किट, कचऱयाला आग लावण्याच्या घटना व इतर घटनांचा समावेश आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांबरोबर अग्निशमन दल आणि वनखात्यानेदेखील सावध राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात मागील 15 दिवसांत पाच गवतगंजींना आग लागून नुकसान झाले आहे. दरवर्षी उन्हाळय़ाच्या दिवसात अशा घटनांच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये जनावरांच्या चाऱयाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे चारा प्रश्नही गंभीर बनत आहे. याकरिता आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
मागील आठवडय़ापासून उष्म्यात कमालीची वाढ झाली आहे. शहराचा पारा 36 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. घरे, दुकाने, कारखाने याबरोबरच शिवारात ठेवलेल्या गवतगंजींना आग लागून नुकसानीच्या घटना घडत आहेत. याकरिता शहराबरोबर ग्रामीण भागातदेखील अग्निशमन बंब उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
वनक्षेत्रालाही फटका
यंदा तुर्कमट्टी येथील वनक्षेत्राला आग लागून नुकसान झाले आहे. वनक्षेत्रात असलेल्या विविध झाडांबरोबर वन्यजीवांनाही याचा फटका बसला आहे. दरवषी वनक्षेत्राला वणवा लागून नुकसान होत असते. याकरिता वन खात्याने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.