अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी
सायकलिंगमध्येही महाराष्ट्राची दणकेबाज कामगिरी
वृत्तसंस्था/ पटना
खेलो इंडियाच्या इतिहासात महाराष्ट्राने प्रथमच अॅथलेटिक्सच्या मैदानावर 10 सुवर्ण, 3 रौप्य व 2 कांस्य अशी एकूण 15 पदकांची लयलूट करीत 7 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला. ही ऐतिहासिक कामगिरी करताना महाराष्ट्राच्या धावपटूंनी तीन नवे विक्रम प्रस्तापित केले, हे विशेष. बुधवारच्या दिवशी हर्षल जोगे, भूमिका नेहासे व अंचल पाटील या मराठमोळ्या खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकून अॅथलेटिक्सचे मैदान गाजविले. याचबरोबर महाराष्ट्राच्या महिला रिले संघाने रौप्यपदकाने स्पर्धेची सांगता केली.

पाटनातील पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी अॅथलेटिक्सचा थरार समाप्त झाला. मुलांच्या 800 मीटर शर्यतीत हर्षल जोगे याने 1 मिनिट 53.99 सेंकद वेळेसह बाजी मारत महाराष्ट्राला अॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीच्या या खेळाडूने अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सोनेरी यश संपादन केले. उत्तर प्रदेशच्या ग्यान सिंग यादवने 1 मिनिट 54.90 सेंकद वेळेसह रौप्यपदक जिंकले, तर उत्तराखंडचा सुरज सिंग 1 मिनिट 56.70 सेंकद वेळेसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
नाशिकच्या भूमिका नेहासे हिने मुलींच्या 200 मीटर शर्यतीतील बाजी मारत महाराष्ट्राला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. तिने ही थरारक लढत 24.51 सेंकदात जिंकली. हरयाणाच्या प्रिशा मिश्रा हिला 24.62 सेंकद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर तिचीच राज्य सहकारी आरती कुमारी हिने 24.94 सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
मुलींच्या उंच उडीत ठाणे जिह्याच्या अंचल पाटील हिने 1.68 मीटर उडी मारत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. पश्चिम बंगालच्या समाप्ती घोष हिने 1.55 मीटर उडीसह रौप्यदपकाला गवसणी घातली. तमिळनाडूची ब्रिंदा ए ही 1.55 मीटर उडीसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. समाप्ती आणि ब्रिंद्रा यांनी सारखीच उडी मारली असली, अधिक फाऊलमुळे बिंद्राला तिसरे स्थान मिळाले.
रिले संघाला सुवर्णपदकाची हुलकावणी
श्रेष्ठा शेट्टी, भूमिका नेहासे, कशिश भगत, मानसी देहरेकर या महाराष्ट्राच्या चौकडीला मुलींच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत एका सेंकदाच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. 3 मिनिटे 49.44 सेंकद वेळेसह महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हरयाणाच्या संघाने 3 मिनिटे 48.44 सेंकद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तमिळनाडूला 3 मिनिटे 51.55 सेंकद वेळेसह कांस्यपदक मिळाले.

टेनिसमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा चौकार!
महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशा एकूण चार पदकांना गवसणी घातली. मुलींच्या दुहेरीत ऐश्वर्या जाधव-आकृती सोनकुसारे या जोडीला सुवर्णपदक मिळाले. ऐश्वर्या जाधवने मुलींच्या एकेरीतही रौप्यपदकाची कमाई केली. मुलांच्या एकेरीत अर्नव पापरकर, तर मुलींच्या दुहेरीत नैनिका रे•ाr व प्रिशा शिंदे जोडीला कांस्यपदक मिळाले.
मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधव-आकृती सोनकुसारे या द्वितीय मानांकित जोडीने अंतिम फेरीत तेलंगणाच्या लक्ष्मी दांडू व रिशिता रे•ाr या अव्वल जोडीचा 6-0, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. याचबरोबर ऐश्वर्या जाधवन हिने मुलींच्या एकेरीत रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदकाच्या लढतीत या द्वितीय मानांकित खेळाडूला अव्वल मानांकित तेलंगणाच्या रिशिता रे•ाr हिने 6-1, 2-6, 6-3 असे हरविले. मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या अर्नव पापरकरने चतुर्थ मानांकित समर्थ साहिता याचा 6-0, 5-2 असा धुव्वा उडवून कांस्यपदक जिंकले. मुलींच्या दुहेरीत नैनिका रे•ाr व प्रिशा शिंदे या महाराष्ट्राच्या बिगरमानांकित जोडीने चतुर्थ मानांकित उत्तर प्रदेशच्या महिका खन्ना व शगून कुमारी या जोडीचा 6-2, 6-2 असा पराभव करीत कांस्यपदकाला गवसणी घातली.
कुस्तीत ऋतुजा गुरवची सुवर्ण स्वप्नपूर्ती, अभिमन्युला रौप्य
पटना (बिहार) : चिवट झुंज देत महाराष्ट्राच्या ऋतुजा गुरवने खेलो इंडिया स्पर्धेतील कुस्ती मैदानात आपले सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. महाराष्ट्राच्या मल्लांनी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 1 सुवर्ण 1 रौप्य व 1 कांस्य पदकाची लयलूट केली.
ज्ञानभवन सांस्कृतिक हॉलमध्ये सुरू असणाऱ्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या युवा मल्लांनी पुन्हा एकदा खेलो इंडिया कुस्ती मैदान गाजवले. मुलींच्या 46 किलो गटातील फ्रीस्टाईल प्रकारात हरयाणाच्या अन्नुवर मात केली. कोल्हापूरच्या ऋतुजाने सुरूवातीपासून आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन घडवले. दुसऱ्या फेरीत 6-2 गुणांची कमाई करीत तिने अंतिम लढत जिंकली.
ग्रीको रोमन प्रकारातील 71 किलो गटात बारामतीच्या अभिमन्यु चौधरवर हरियाणाच्या विनीतकुमाने बाजी मारली. 1-9 गुणांनी अभिमन्युना रूपेरी यशावर समाधान मानावे लागले. ग्रीको रोमन प्रकारातील 51 किलो गटात कोल्हापूरच्या आदित्य जाधवने यजमान बिहारच्या जहिर रजाकला 10-1 गुण फरकाने लोळवून मात करीत कांस्यपदक पटकावले. 55 किलो फ्रीस्टाइल प्रकारात सोहम कुंभारने मध्यप्रदेशच्या हितेश कुशवाहवर 10-0 गुणांनी एकतर्फी पराभव करीत कास्य पदकावर नाव कोरले. 55 किलो फ्रीस्टाइल प्रकारात धनराज जमनीक याला राजस्थानचा राकेश कुमार गैरहजर राहिल्याने कांस्यपदक बहाल करण्यात आले. गुरूवारी (15 मे) स्पर्धेचा समोरापही सुवर्णमय करण्यासाठी महाराष्ट्राचे मल्ल सज्ज झाले आहेत.
सायकलिंगमध्ये महाराष्ट्राचा जयजयकार, मुलींनी जिंकले विजेतेपद
खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णासह रौप्यपदक पटकावित चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. 60 कि.मी वैयक्तिक सायकल शर्यतीत मुंबईच्या आभा सोमणने सुवर्ण, तर सांगलीच्या आसावरी राजमाने हीने रूपेरी यशाला गवसणी घातली.
गंगा नदीच्या किनाऱ्यावरील मरीन ड्राईव्ह परिसरात संपलेल्या या सायकलिंग शर्यतीत देशभरातील 31 युवा खेळाडूंनी भाग घेतला होता. शर्यतीत सुरूवातीपासून महाराष्ट्राच्या आभा सोमण, आसावरी राजमाने व गायत्री ताम्बवेकर यांनी आघाडी घेतली होती. 20 किमी नंतर आभा, आसावरी, गायत्रीसह तामिळनाडूच्या के. हंसिनी यांच्यात शर्यत रंगली. शेवटच्या टप्पात आभा व आसावरीने मुसंडी मारत एकत्रित शर्यत पूर्ण केली. अंतिम क्षणी आभाने बाजी मारली. 2.21.46.941 तासाची वेळ देत आभाने सुवर्णपदकवर नाव कोरले. 2.21.46.987 वेळेत शर्यत पूर्ण करीत आसावरीने रूपेरी यश संपादन केले.
तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी चुरस पहाण्यास मिळाली. गायत्री व के. हंसिनी यांनी एकत्रित शर्यत पूर्ण केली. के. हंसिनीने 2.21.47.680 वेळ नोंदवून कांस्यपदकाचे यश संपादन केले. 2.21.47.709 वेळेत शर्यत पार केलेल्या गायत्री ताम्बवेकर हिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. रोड सायकलिंग स्पर्धेत 1 सुवर्ण, 2 रौप्य पदकाची लयलूट करीत महाराष्ट्राने मुलींच्या गटातील विजेतेपद पटकावले.