अल्पेश ठाकोरना उमेदवारी जाहीर
भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी : आतापर्यंत 197 नावांची घोषणा
वृत्तसंस्था /गांधीनगर
भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 12 उमेदवारांची नावे सामील आहेत. अल्पेश ठाकोर यांना गांधीनगर दक्षिण मतदारसंघाची उमेदवारी जाहीर जाली आहे. भाजपने 182 मतदारसंघांपैकी आतापर्यंत एकूण 179 जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत. गुजरातमध्ये भाजप सत्तेवर आल्यास भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी गुजरात निवडणुकीसाठी भाजपने मागील आठवडय़ात गुरुवारी पहिली यादी जारी केली होती. या यादीत 160 उमेदवारांची नावे सामील होती तसेच यात 14 महिलांना स्थान मिळाले होते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घाटलोढिया मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसकडून एमी यागनिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या जागी डॉ. दर्शिता शाह या राजकोट पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
रविंद्र जडेजाच्या पत्नीला संधी
मोरबी मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार बृजेश यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याऐवजी माजी आमदार कांतिलाल अमृतिया यांना संधी देण्यात आली आहे. मोरबी पूल दुर्घटनेवेळी कांतिलाल यांनी लोकांचा जीव वाचविण्यासाठी मच्छू नदीत उडी घेतली होती. तर क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा हिला जामनगर उत्तर मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे. रीवाबा आता पती रविंद्र जडेजासोबत या मतदारसंघात प्रचार करत आहे.
दोन टप्प्यांमध्ये निवडणूक
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 1 डिसेंबर रोजी 89 मतदारसंघांमध्ये तर 5 डिसेंबर रोजी 93 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. 8 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.