अल्कारेझ, सिनर उपांत्यपूर्व फेरीत
इंडियन वेल्स
येथे सुरू असलेल्या एटीपी-डब्ल्यूटीए इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत विद्यमान विजेता कार्लोस अल्कारेझ व त्याचा इटालियन प्रतिस्पर्धी यानिक सिनर यांच्यात उपांत्य फेरीत गाठ पडण्याची शक्यता आहे. या दोघांनीही या स्पर्धेत पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
अल्कारेझने याआधी झालेल्या पराभवाचा वचपा काढताना हंगेरीच्या फॅबियन मॅरोझसनवर 6-3, 6-3 असा विजय मिळविला तर सिनरने जबरदस्त फॉर्म कायम राखताना बेन शेल्टनवर 7-6 (7-4), 6-1 अशी मात केली. सिनरचा हा सलग 18 वा विजय असून या वर्षातील तिसरे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने त्याने आगेकूच केली आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन व रॉटरडॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. सिनर व स्पेनचा विम्बल्डन विजेता अल्कारेझ यांच्यात उपांत्य फेरीत गाठ पडण्याची शक्यता आहे. पण त्याआधी अल्कारेझला उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हला हरवावे लागेल. व्हेरेव्हने अॅलेक्स डी मिनॉरवर विजय मिळवित आगेकूच केली आहे.
अन्य सामन्यात ग्रीकच्या स्टेफानोस सित्सिपसला पराभवाचा धक्का बसला. झेकचा युवा खेळाडू जिरी लेहेकाने त्याला स्पर्धेबाहेर घालविले. महिला विभागात अग्रमानांकित इगा स्वायटेकने युलिया पुतिनत्सेव्हाचा पराभव केला. तिची उपांत्यपूर्व लढत कॅरोलिन वोझ्नियाकीशी होईल. वोझ्नियाकीने जर्मनीच्या अँजेलिक केर्बरचा पराभव केला.