अर्थव्यवस्था सुस्थिर होण्यासाठी शांतता आवश्यक
पंतप्रधान मोदी यांचे जी-20 परिषदेत प्रतिपादन, बायडेन, सुनक, मॅक्रॉन यांच्याशी थेट चर्चा
बाली / वृत्तसंस्था
इंडोनेशियातील बाली येथे जी-20 परिषदेत भाग घेण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पारंपरिक थाटात भव्य स्वागत करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांचे येथे आगमन झाले. साधारणतः 48 तास त्यांचे बाली येथे वास्तव्य रहाणार आहे. या काळात ते अनेक राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेणार आहेत. मंगळवारी त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याशी चर्चा झाली. तसेच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशीही त्यांनी द्विपक्षीय संबंधांवर बोलणी केली.
यापूर्वी त्यांनी मंगळवारी सकाळी बाली येथील भारतीय जनसमूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेतला. इंडोनेशिया या देशाशी भारताचे हजारो वर्षांपूर्वीपासूनचे सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध आहेत. या दोन्ही देशांचा पुरातन इतिहास समान आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळांमध्ये आम्ही एकमेकांसह आहोत. 2018 मध्ये इंडोनेशियाला भूकंपाचा धक्का बसला होता, तेव्हा भारतच सर्वप्रथम या देशाच्या साहाय्यार्थ धावून आला होता. भारताच्या ओडीशा राज्याच्या कटक जिल्हय़ात सध्या बाली महोत्सव होत आहे. शेकडो वर्षांपासून हा महोत्सव होत आहे. बालीतील गाणी भारतात गायली जातात. भारताच्या रामायण-भारतासारख्या गंथांवर इंडोनेशिया आणि बालीची संस्कृती आधारित आहे, अशा अर्थाचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले.
जी-20 परिषदेत भाषण
नंतर पंतप्रधान मोदी यांनी बाली परिषदेत भाषण केले. जगाला आज शांततेची आवश्यकता असून पुन्हा शांततेच्या मार्गाकडे वाटचाल होणे आवश्यक आहे. रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा आणि वाटाघाटी हाच पर्याय आहे. त्यामुळे संबंधित पक्षांनी या पर्यायावरच भर देऊन शांतता प्रस्थापित केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. रशिया-युक्रेन युद्ध, कोरोनाचा उद्रेक आणि पर्यावरणाची हानी या तीन कारणांमुळे जगातील पुरवठा साखळय़ांवर विपरीत परिणाम झाला आहे. जी-20 परिषदेने त्वरित या परिस्थितीत लक्ष घालणे आवश्यक आहे. जगाला आज या परिषदेकडून अधिक अपेक्षा आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अन्न आणि ऊर्जा सुरक्षा
अन्न सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षेचा महत्वाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. अन्न धान्ये आणि खते यांच्या पुरवठा साखळय़ा उद्धवस्त झाल्याने जगभरातील गरीबांची स्थिती दयनीय बनली आहे. त्यांचे दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. यातून त्यांची सुटका करायची असेल तर युद्धासारख्या घटना लवकरात लवकर थांबावयास हव्यात. यात जी-20 ने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
युनोसारखी संस्था अपयशी
जगासमोर आज अनेक जटील आव्हाने उभी असून संयुक्त राष्ट्रसंघासारखी संस्थाही ती स्वीकारण्यात अपयशी ठरली आहे. त्याचप्रमाणे इतरही बहुउद्देशीय आणि बहुराष्ट्रीय स्पर्धा यशस्वी ठरलेल्या नाहीत. ही गंभीर परिस्थिती असून त्यातून लवकर मार्ग निघणे आवश्यक आहे, असे प्रतादन त्यांनी केले.
भारत-अमेरिका संबंधांचा आढावा
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याशी थेट चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांच्या सामरिक भागीदारीचा आणि द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. आधुनिक आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान, तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता, संरक्षण साधने अशा विषयांचा चर्चेत समावेश होता, असे नंतर स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे जागतिक आणि विभागीय घटनांवरही त्यांनी चर्चा केली, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने दिली.
ब्रिटनच्या पंतप्रधांनशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला अशी अनधिकृत माहिती आहे. गेली दोन वर्षे हा करार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. तथापि, अद्याप त्याला मूर्त स्वरुप आलेले नाही. सुनक यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात हा करार केला जाईल, अशी अपेक्षा भारतातील राजकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याशीही पंतप्रधान मोदींनी थेट चर्चा केली.
भरगच्च कार्यक्रम
- पंतप्रधान मोदी बालीला पोहचल्यापासून 45 तासात 48 कार्यकम
- पंतप्रधान मोदींचे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन
- अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन, ब्रिटन पंतप्रधान सुनक यांच्याशी चर्चा
- शांततेच्या मार्गाकडे जाणे हाच उपाय : जी-20 परिषदेत भाषण