अमेरिकेत इस्रायलविरोधी निदर्शने तीव्र
हार्वर्ड विद्यापीठात निदर्शकांनी फडकविला पॅलेस्टाइनचा झेंडा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
हमास आणि इस्रायल यांच्यात मागील 6 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे गाझामध्ये निर्माण झालेल्या संकटावरून अमेरिकेत आक्रोश वाढत चालला आहे. अमेरिकेत इस्रायलच्या विरोधात निदर्शने होत आहेत. विशेषकरून विद्यापीठांच्या परिसरांमध्ये इस्रायलच्या विरोधात विद्यार्थी निदर्शने करत असल्याने तणाव वाढला आहे. या निदर्शनांमध्ये सामील सुमारे 275 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे हार्वर्ड विद्यापीठात निदर्शकांनी अमेरिकेचा ध्वज फडकणाऱ्या ठिकाणी पॅलेस्टाइनचा झेंडा फडकविल्याने संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी चार वेगवेगळ्या विद्यापीठांच्या परिसरातून सुमारे 275 जणांना अटक करण्यात आली आहे. बोस्टनमध्ये नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून 100, सेंट लुइसमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठातून 80, अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतून 72 आणि इंडियाना विद्यापीठातून 23 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
युसीएलएमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टिनी समर्थकांमध्ये झटापट झाली आहे. अध्यक्ष जो बिडेन यांनी देशव्यापी निदर्शनांची दखल घेतली असून निदर्शने शांततापूर्ण मार्गाने व्हावीत असे व्हाइट हाउसने म्हटले आहे. निदर्शक सातत्याने हमास-इस्रायल युद्धात शस्त्रसंधी लागू करण्याची मागणी करत आहेत. गाझामध्ये संघर्षामुळे लाभ होणाऱ्या कंपनी आणि लोकांसोबतचे संबंध अमेरिकेने तोडावेत असे निदर्शकांचे म्हणणे आहे.
विद्यापीठ प्रशासनासाठी ही निदर्शने आव्हान ठरली आहेत. प्रशासन निदर्शनेविरोधी तक्रारींसोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची प्रतिबद्धता संतुलित करयणचा प्रयत्न करत आहे. अध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्यासोबत चर्चा करत गाझाचे सीमावर्ती शहर राफावरील संभाव्य हल्ल्यावरून स्वत:ची स्थिती स्पष्ट केली आहे.
हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या शहरांवर 5 हजारांवून अधिक रॉकेट्स डागून हल्ल्याची सुरुवात केली होती. यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून 1200 हून अधिक लोकांची हत्या केली होती. याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने हमासच्या विरोधात गाझामध्ये मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत गाझामधील हमासच्या तळांवर मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव करण्यात आला आहे. गाझामध्ये आतापर्यंत 30 हजारांहून अधिक जण मारले गेले आहेत.