अमेरिकेच्या व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सची रिलायन्स 'जिओ'मध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेतील 'व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स' ही खासगी कंपनी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे या कंपनीची जिओमध्ये 2.32 टक्के हिस्सेदारी असेल. रिलायन्सने आज याबाबतची घोषणा केली आहे.
जिओ प्लॅटफॉर्मचा व्हिस्टा इक्विटी पार्टनर्ससोबतचा हा तिसरा मोठा करार आहे. यापूर्वी मागील महिन्यात फेसबुक आणि सिल्वर लेक या मोठ्या कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. फेसबुकने 43,534 कोटींची गुंतवणूक करत जिओमध्ये 9.9 टक्के भागीदारी निश्चित केली आहे. तर सिल्वर लेकने जिओमध्ये 5655 कोटींची गुंतवणूक करत 1.55 टक्के भागीदारी खरेदी केली आहे.
फेसबुक, सिल्वर लेक आणि व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स या तिन्ही कंपन्यांसोबतच्या करारामुळे तीन आठवड्यात रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 60, 596.37 कोटी रुपये जमा झाले आहेत. व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सच्या 11,367 कोटींच्या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 5.16 लाख कोटी होईल, असे जिओकडून सांगण्यात आले आहे.