अंगठय़ामुळे समजला घरचा पत्ता
कानपूर येथील एका शासकीय बालिकागृहात एक दिव्यांग (मूकबधीर) मुलगी गेल्या दोन वर्षांपासून राहात होती. तिच्या घरचा पत्ता मिळत नव्हता, ती बोलू किंवा ऐकू शकत नसल्याने तो पत्ता सांगूही शकत नव्हती. त्यामुळे तिला घरी कसे पोहोचवावे ही विवंचना बालिकागृहाच्या व्यवस्थापनाला जाणवत होती.
तथापि आश्चर्याची बाब म्हणजे दोन वर्षानंतर तिच्या अंगठय़ामुळे तिच्या घरचा पत्ता सापडला आणि तिला घरापर्यंत नेण्यात आले. घरच्या लोकांनी तिला त्वरित ओळखले आणि अशा प्रकारे तिचे घरच्या लोकांशी मिलन होऊ शकले.
अंगठय़ावरून तिचा पत्ता सोडण्यात ‘भारतीय विशिष्ट ओळख’ प्राधिकरणाची महत्त्वाची भूमिका राहिली. तिच्या अंगठय़ाचे चिन्ह (थंब इन्प्रेशन) आणि डोळय़ाचे स्कॅनिंग करून त्यावरून अहवाल बनविण्यात आला. या अहवालाच्या आधारे प्राधिकरणाने तिचा घरचा पत्ता शोधून काढला. त्याआधी महिला कल्याण निर्देशालयाकडून बेपत्ता मुलांचे आधार कार्ड बनविण्याचा आदेश दिला होता. आधारकार्ड बनविण्यासाठी तिच्या अंगठय़ाचे चिन्ह आणि आयस्कॅन घेण्यात आले होते. ज्यावेळेला अंगठय़ाचे चिन्ह आणि आयस्कॅनच्या आधारे संगणकाद्वारे तिची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. तेव्हा पूर्वी तिच्या घरी असताना घेतलेले अंगठय़ाचे निशाण आणि आय स्कॅन सापडले. हे दोन्ही एकमेकांशी जुळल्याने तिच्या घरचा पत्ता सापडू शकला. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या दिव्यांग मुलीला तिचे घर पुन्हा मिळवून देण्यात यश आले.