For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्मयोग म्हणजे निरपेक्षतेनं कर्म करणे

06:55 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्मयोग म्हणजे निरपेक्षतेनं कर्म करणे
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

इंद्रियजयाविषयी बाप्पा सांगत आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार माणसाला केव्हा कशाचा मोह होईल हे काही सांगता येत नाही. माणसाला मोहात पाडण्याचे काम ज्ञानेंद्रिये करत असतात, त्याची ज्ञानेंद्रिये त्याच्या आवडीच्या विषयांकडे त्याचे लक्ष वेधीत असतात. जेणेकरून त्या विषयांचे सुख घेण्याचा मोह त्याला व्हावा. अर्थात परमार्थसाधना करण्याची इच्छा बाळगणाऱ्या साधकाला असा मोह होणे हे त्याच्या साधनेमध्ये एक विघ्नच असते. ते टळावे म्हणून साधक इंद्रियांनी सुचवलेल्या विषयोपभोगाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो परंतु असे फार काळ चालू शकत नाही कारण इंद्रियांची ताकद मोठी असते. त्यामुळे इंद्रिये साधकाला त्यांच्यामागून फरफटत नेतात. हे समजून घ्यायचं झालं तर पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. समजा एखाद्या झाडाच्या फांद्या कापून टाकल्या व मुळांना पाणी घालत राहिलं तर त्या झाडाला पुन:पुन्हा पालवी फुटणारंच. तसं मनात जर विषयांचं चिंतन चालू राहिलं की, इंद्रिये विषयोपभोग दाखवत राहणारच. त्यामुळे इंद्रियांना जबरदस्तीनं गप्प बसवून मनुष्य विषयांपासून दूर राहू शकत नाही. हे सर्व लक्षात घेऊन साधकाने मर्यादित प्रमाणात विषयोपभोग घ्यावा म्हणजे त्याची कुतरओढ होणार नाही. हळूहळू त्याचे त्यालाच विषयातून मिळणारा आनंद अल्पकाळ टिकणारा असून शेवटी तो दु:खच देतो हे लक्षात येऊ लागले की, तो आपोआपच विषयांपासून दूर होत जाऊन आत्मज्ञानप्राप्तीच्या जवळ जात राहील. त्याला जेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होईल तेव्हा त्याने संपूर्णत: इंद्रियजय साधलेला असेल.

साधकाला आपण लवकरात लवकर इंद्रियजय साधावा अशी इच्छा तर असते परंतु बाप्पांनी वर सांगितल्याप्रमाणे आत्मज्ञानाशिवाय इंद्रियजय साधला जात नाही हे समजल्यावर तो कदाचित निराश होण्याची शक्यता आहे कारण आत्मज्ञान प्राप्त होणे ही किती दुरापास्त गोष्ट आहे हे तो जाणून असतो आणि ते मिळेस्तोवर विषय आपल्याला सोडणार नाहीत ही जाणीव त्याला अस्वस्थ करत असते. धड साधनाही नाही आणि धड विषयांच्या उपभोगाचा आनंदही नाही अशा विलक्षण द्विधा मन:स्थितीत तो असतो. त्याला आता पुढे काय करावे म्हणजे विषयांच्या तावडीतून आपली सुटका होईल हेच समजत नसते. हे लक्षात घेऊन विघ्नहर्ते बाप्पा पुढील श्लोकात इंद्रियजय साधण्यासाठी दुसरी आणि लगेच अंमलात आणता येईल अशी युक्ती सांगत आहेत. ते म्हणतात,

Advertisement

तद्ग्रामं संनियम्यादौ मनसा कर्म चारभेत् ।

इन्द्रियै कर्मयोगं यो वितृष्ण स परो नृप ।। 6 ।।

अर्थ-अगोदर मनाने इंद्रिय-समुदायाचे नियमन करून, विषयांविषयी इच्छा नसलेला पुरुष कर्म व कर्मयोग आरंभ करतो तो, श्रेष्ठ होय.

विवरण-इंद्रियजय साधण्यासाठी बाप्पा सांगतायत की, राजा इंद्रियांना काहीही न करता गप्प बसा अशी दमदाटी करण्यात अर्थ नाही कारण इंद्रियांची वर्तणूक मनावर अवलंबून असते. मन एखाद्या लहान मुलासारखे चंचल असते. एखादी गोष्ट करू नकोस असं म्हंटलं की लहान मूलं ती गोष्ट आवर्जून करणार. मनाचंही तसंच आहे. एखादी गोष्ट करायची नाही असं ठरवलं तरी मन इंद्रिये त्याला ती गोष्ट करायला लावतातच.

मनाचा हा गुण म्हणा, दुर्गुण म्हणा लक्षात घेऊन वाट्याला आलेली कर्मे कितीही करायची नाहीत असं तू ठरवलंस तरी मन ती करायला पाहणारच. म्हणून वाट्याला आलेली कर्मे कर्मयोग आचरण्याच्या दृष्टीने करायला सुरुवात कर. कर्मयोग म्हणजे निरपेक्षतेनं कर्म करणे. आता वाट्याला आलेलं काम सर्वांच्या आवडीचं असतंच असं नाही. तरीही वाट्याला आलंय ना मग करायचं तेही निरपेक्षतेनं हे तत्व लक्षात ठेव. तू म्हणशील वाट्याला आलेलं कर्म मला आवडत नाही मग मी ते का करायचं? तर त्याचं कारण मी सांगतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.