For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झुकरबर्ग यांची क्षमायाचना ?

06:24 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
झुकरबर्ग यांची क्षमायाचना
Advertisement

भारत सरकार आणि विश्वविख्यात उद्योगपती मार्क झुकरबर्ग यांची ‘मेटा’ कंपनी यांच्यात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘मेटा’च्या माध्यमातून फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सेशल मीडिया प्लॅटफॉर्म्स् चालविले जातात. या प्लॅटफॉर्मवरुन मोठ्या प्रमाणात संदेश प्रसारण केले जाते आणि ही माध्यमे जगभरात उपयोगात आणली जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक फेसबुक पोस्ट मेटाकडून अचानक हटविली गेली. ती दिसेनाशी झाल्यामुळे मेटाकडे तक्रार करण्यात आली. मेटाच्या म्हणण्यानुसार ती पोस्ट हेतुपुरस्सर हटविली नव्हती. तर ती एका ‘तांत्रिक समस्ये’मुळे हटविली गेली होती. तथापि, केंद्र सरकारचे या स्पष्टीकरणाने समाधान झाले नाही. एखादी पोस्ट कशी हटविली जाते किंवा ती तांत्रिक समस्येमुळे आपोआप कशी नाहीशी होते, याची साद्यंत माहिती केंद्र सरकारने कंपनीकडून मागविली आहे. मेटाने या प्रकरणात भारताची क्षमायाचना केली आहे. तथापि, केंद्र सरकारला थेट या कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांच्याकडून क्षमायाचना हवी आहे. त्यांनी व्यक्तीश: क्षमायाचना करावी. अन्यथा भारतात या कंपनीला जे ‘सुरक्षित वातावरण’ उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्यावर पुनर्विचार करावा लागेल, असा इशारा सध्या या प्रकरणावर विचार करणाऱ्या संसदेच्या स्थायी समितीने दिला आहे. आता मार्क झुकरबर्ग यांनी क्षमायाचना केली आहे, असे वृत्त बुधवारी काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे. हे वृत्त सूक्ष्मपणे पाहिले असता, ही क्षमायाचना केवळ भारत आणि मेटा यांच्यात जो वाद होत आहे, त्याविषयी नसल्याचे दिसून येते. या क्षमायाचनेत बाल लैंगिक शोषण आशय (चाईल्ड सेक्शुअल अॅब्यूज कंटेंट), डीपफेक्स (खरी वाटेल अशी बनावट व्हिडीओग्राफी) आणि ‘तांत्रिक चुका’ हे तीन्ही मुद्दे मार्क झुकरबर्ग यांनी समाविष्ट केल्याचे स्पष्ट होत आहे. भारताचा मेटाशी जो वाद होत आहे, तो ‘तांत्रिक चुका’ या मुद्द्यासंबंधीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो संदेश फेसबुकवरुन हटविला गेला, तो तांत्रिक चुकीमुळे हटविल्याचे स्पष्टीकरण मेटाने दिले आहेच. तसेच कंपनीच्या वतीने क्षमायाचनाही करण्यात आली आहे. आता मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्तीश: क्षमायाचनेचे निवेदन प्रसारित करताना त्यात ‘तांत्रिक चुका’ हा मुद्दाही समाविष्ट केल्याने त्यांना, सध्या भारताशी मेटाचा जो वाद होत आहे, त्याविषयीही क्षमायाचना करायची आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांची पोस्ट हटविली जाणे यांचा स्पष्टपणे उल्लेख करुन त्यांनी क्षमायाचना केलेली नाही. मात्र, मेटाकडून तांत्रिक चुका होत आहेत आणि त्यांच्या संबंधात आपल्याला खेद होत आहे, हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे. त्यांच्या या अशा ‘अप्रत्यक्ष क्षमायाचने’वर केंद्र सरकारचे समाधान होणार का, हा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचे, तर अप्रत्यक्ष क्षमायाचना स्वीकारुन हे प्रकरण मिटविले जाणार, की संसदीय स्थायी समिती मार्क झुकरबर्ग यांच्याकडून स्पष्ट शब्दांमध्ये क्षमा मागा, असा आग्रह धरणार, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट  हटविण्याचा जो प्रकार घडला, तो गंभीर निश्चितच आहे. कारण, अशाच प्लॅटफॉर्म्स्चा उपयोग करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत बीभत्स शब्दांमध्ये निंदानालस्तीही होत असते. त्या पोस्टस् ‘चुकूनसुद्धा’ किंवा ‘तांत्रिक समस्ये’मुळे हटविल्या गेल्या आहेत, असे दिसून येत नाही. त्यामुळे कंपनीकडूनच ‘तांत्रिक चुकी’च्या आवरणाखाली पक्षपात केला जातो काय, असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या काळात असे प्लॅटफॉर्म्स् हे सर्वसामान्य जनतेला कोणाच्या तरी विरोधात किंवा कोणाच्यातरी बाजूने भडकविण्याचे आणि बहकविण्याचे साधन म्हणून उपयोगात आणले जातात हे अनेकदा दिसून आले आहे. अशा स्थितीत संदेश प्रसारित करताना कंपनीने समतोल आणि न्यायपूर्ण भूमिका न घेतल्यास मोठा गेंधळ होऊ शकतो. तसेच एखाद्या महनीय व्यक्तीची नाहक बदनामी किंवा अवमानना होऊ शकते. सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते. दंगली घडू शकतात. हिंसाचार होऊ शकतो आणि त्यामुळे एखाद्या देश वा समाजाची अपरिमित हानी होऊ शकते. नंतर क्षमायाचना करुनही झालेली हानी भरुन निघणार नसते. असे प्लॅटफॉर्म्स् हे दुधारी शस्त्र असते. त्यांना नियंत्रित करणाऱ्या कंपन्यांकडून समंजसपणाने आणि जबाबदारीने वागण्याची अपेक्षा असते. सरकार-मेटा यांच्यातील सध्याच्या वादामुळे हे प्रश्न पुन्हा पेटले आहेत. प्रश्न क्षमायाचनेचा नाही. तर तशी वेळच येऊ नये, याची दक्षता घेण्याचा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.