झुकरबर्गनी श्रीमंतांमध्ये गेटस्ना टाकले मागे
ब्लूमबर्गची ताजी यादी जाहीर : झुकरबर्ग चौथे सर्वाधिक श्रीमंत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मार्क झुकरबर्ग यांनी श्रीमंतांच्या यादीमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस् यांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर निर्देशांकाच्या ताज्या अहवालात ही माहिती सोमवारी समोर आली आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर निर्देशांकामध्ये ताज्या माहितीनुसार मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे आता जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. त्यांनी यादीमध्ये मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांना मागे टाकले आहे.
फेसबुकचा 20 वा वाढदिवस
फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा विसावा वाढदिवस सोमवारी झुकरबर्ग यांनी मेणबत्ती आणि केकच्या माध्यमातून साजरा केला. या वाढदिवसाच्या दिवशीच झुकरबर्ग यांनी वरील कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आता ते जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत चौथ्या स्थानावर आले आहेत.
किती वाढली रक्कम
मेटा कंपनीचे समभाग शेअर बाजारामध्ये 22 टक्क्यांनी वाढल्यामुळे आपसूकच झुकरबर्ग यांच्या संपत्तीमध्ये वाढ नोंदवली गेली. 28 अब्ज डॉलर्स इतक्या रकमेसह 170 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती त्यांनी एकंदर जमवली आहे. त्यांनी 145 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असणाऱ्या बिल गेट्स यांना मागे टाकले आहे.
पहिले तीन कोण
जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर बर्नार्ड अरनॉल्ट, दुसऱ्या क्रमांकावर जेफ बेजोस आणि एलॉन मस्क तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार झुकरबर्ग यांच्या संपत्तीमध्ये पुन्हा मार्चमध्ये मेटाकडून दिल्या जाणाऱ्या लाभांशामुळे 174 दशलक्ष डॉलरच्या रोख रकमेचीही भर पडणार आहे.