For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झेडपी निकालांचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम नाही

07:30 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
झेडपी निकालांचा विधानसभा  निवडणुकीवर परिणाम नाही
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा ठाम विश्वास

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

जिल्हा पंचायत निवडणुकीत काही मंत्री व आमदारांच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांना धक्का बसलेला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सरचिटणीस सर्वानंद भगत, ऊपेश कामत यांची उपस्थिती होती.

Advertisement

पुढे बोलताना नाईक यांनी, गत जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने हळदोणा, शिरसई, सेंट लॉरेन्स, बेतकी-खांडोळा, दवर्ली, गिरदोली आणि खोल, जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्या मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे मंत्री बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, आमदार उल्हास तुयेकर यांच्या उमेदवारांना अपयशाचा सामना करावा लागला, असे सांगितले. मात्र हे सर्व खरे असले तरी, 2020 च्या झेडपी निकालाच्या 39 टक्के मतांच्या तुलनेत या निवडणुकीत 40.96 टक्के मते मिळाली आहेत. यावरून जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हा पंचायत निकालाचा 2027च्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. उलटपक्षा या निवडणुकीत भाजप मगो युतीला 30 पेक्षा जास्त जागा प्राप्त होतील, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

सासष्टीत मतदारांनी नाकारलेले नाही : नाईक

दरम्यान, विद्यमान झेडपी निवडणुकीत सासष्टीतील खिस्ती मतदारांनी भाजपला नाकारले का? असे विचारले असता, सासष्टीतील मतदारसंघांत स्वत:चे उमेदवार ठेवण्यापेक्षा भाजपने तेथील अपक्षांना पाठिंबा देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र त्यासंबंधी कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. अशावेळी तेथील खिस्ती मतदारांनी भाजपला नाकारले असे म्हणता येणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

झेडपीच्या कामगिरीवर पक्ष समाधानी

सरकारच्या चांगल्या कामांमुळेच दोन्ही जिल्हा पंचायतींत पक्षाला विजय मिळाला. त्यामुळे पक्षाच्या जागा कमी झाल्या असल्या तरी एकुणच कामगिरीवर पक्ष समाधानी आहे. त्याचबरोबर मगो पक्षाविषयी कोणत्याही आमदाराची तक्रार आमच्याकडे पोहोचलेली नाही. पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी आल्यास त्यांची निश्चित चौकशी होईल, असे नाईक यांनी अन्य एका प्रश्नावर सांगितले.

Advertisement
Tags :

.