जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यानंतर होणार
विधानसभा निवडणुकीपुर्वी उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात न्याय मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र, जनतेने आम्हाला न्याय दिला.
सोलापूर : मुंबई, ठाणे महापालिकांसह राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या सात महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीतही महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुकीस आम्ही सामोरे जाणार असल्याची माहिती राज्याचे रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे शनिवारी सोलापुरात आले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथील कार्यालयाला भेट दिली.
यावेळी आ. सुभाष देशमुख, शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी गोगावले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुंबई व ठाणे महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहे. अडीच वर्षांपूर्वीच मला मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र, काही नाराजांना त्यावेळी संधी देण्यात आली. आता मला संधी देण्यात आली आहे. मंत्रीपद तर मिळाले आहे, आता पालकमंत्रीपद मिळण्याचे साकडे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना घातले आहे. अक्षयतृतीयेपूर्वी पालकमंत्री यांच्या नियुक्ती होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीपुर्वी उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात न्याय मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र, जनतेने आम्हाला न्याय दिला. राजकीय अस्तित्वच शिल्लक राहिले नसल्याने संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्रोश व्यक्त असल्याचे मतही यावेळी गोगावले यांनी व्यक्त केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्रित आले तर ही चांगलीच बाब आहे. मात्र जनता आता सुज्ञ असल्याचेही गोगावले यांनी यावेळी सांगितले.
भरत गोगावले यांचा आमदार देशमुखांना पाठिंबा
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. सुभाष देशमुख व आ. विजयकुमार देशमुख या दोघांनी यावेळी रोहयो मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली. यावेळी गोगावले यांनीही या दोन्ही नेत्यांना पाठिंबा दिला. सोलापुरात बाजार समितीसाठी कशी युती झाली, याबाबत त्यांचे नेते त्यांना विचारतील. परंतु आम्हाला बापूंची भूमिका योग्य वाटली म्हणून काळजे यांनी बापूंना सहकार्य करायचे ठरवले आहे. आमची भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती असून युतीचा धर्म आम्ही पाळणार, असे गोगावले यांनी सांगितले.