ZP Election 2025: कार्यकर्त्यांची प्रसंगी पक्ष बदलाची तयारी, महायुतीत गर्दी, 'महाविकास'ची सावध भूमिका
महाविकास आघाडी आपल्याबरोबर बंडखोरांना घेत विजयाची परफेक्ट तयारी करतंय
By : प्रशांत चुयेकर
कोल्हापूर : भागातलं मिनी आमदार आम्हीच, असा रुबाब मारत लोकसेवेच्या तयारीत असलेले इच्छुक आपल्या पक्षातून तिकीट मिळालं तर ठिक अन्यथा कोणताही झेंडा घेऊ हाती, असा पवित्रा घेत कामाला लागले आहेत. ‘महायुती’मध्ये उमेदवारांची गर्दी आहे. महाविकास आघाडी आपल्याबरोबर बंडखोरांना घेत विजयाची परफेक्ट तयारी करत आहे.
जिल्हा परिषद निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने मिनी मंत्रालयात येणाऱ्या इच्छुकांनी हालचाली गतीमान केल्या आहेत. महायुतीमध्ये उमेदवारांची गर्दी असल्यामुळे प्रसंगी पक्ष बदलण्याची तयारीही कार्यकर्त्यांनी केली आहे. ‘अभी नही तो कभी नही’, असा पवित्रा घेत बंडाचा झेंडा घेतला आहे. त्यामुळे उमेदवारी देताना महायुतीमध्ये दमछाक होणार आहे.
महायुतीमध्ये उमेदवारांची गर्दी
महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आहेत. यावेळी जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर, आमदार चंद्रदिप नरके, आमदार राजेश क्षीरसागर असे तीन आमदार आहेत. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा शिवसेनेला पाठींबा आहे. भाजपचे आमदार अमल महाडिक, आमदार राहूल आवाडेंच्यासोबत भाजपला पाठींबा असणारे आमदार शिवाजी पाटील आहेत.
राष्ट्रवादीचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, तर जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार डॉ. अशोक माने आहेत. या सर्व आमदारांचा कल जिल्हा परिषदेची उमेदवारी आपल्या गटाकडे मिळवण्यासाठी असणार आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातून बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीची सावध भुमिका
महाविकास आघाडीकडून विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील जिह्याचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्यासह डावे पक्ष, आंबेडकरी पक्ष असणार आहेत. गट मोठा दिसत नसला तरी स्थानिक पातळीवर पक्षाकडे पाहिले जात नाही, त्यामुळे महाविकास आघाडीलाही उमेदवार भेटत असल्याचे नेत्यांकडून बोलले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचाच अध्यक्ष
"जिह्यात चार आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचाच असणार आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहे. याबाबतची तयारीही जोरात सुरु आहे."
- नामदेव ऊर्फ पोपट ढवण ,उपजिल्हाप्रमुख, शिवसेना, शिंदे गट
हातकणंगलेमध्ये आम्हाला अधिक जागा
"हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे 8 सदस्य आहेत. त्यामुळे या ठिकाणी अधिक उमेदवार मागणी भाजपची असणार आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आगामी अध्यक्ष महायुतीचाच असेल."
- राजवर्धन निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, कोल्हापूर पूर्व विभाग, भाजप
‘राष्ट्रवादी’चे 25 उमेदवार तयार
"राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 25 उमेदवार तयार आहेत. ते पूर्ण क्षमतेने जिल्हा परिषदेत निवडून येऊ शकतात. महायुती म्हणूनच जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे. महायुतीचाच झेंडा जिल्हा परिषदेवर असणार आहे."
- बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर जिल्हाध्य़क्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट