ZP Election 2025: मिनी विधानसभेसाठी महिला रिंगणात, महायुतीमध्ये चुरस
या जागेसाठीही महिलेला निवडणुकीत उभे करण्याची व्यूहरचना सुरू
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाले आहे. सर्वसाधारण जागेसाठी कोणत्याही जातीतील महिला अध्यक्षपदासाठी पात्र असतात. त्यामुळे सर्वसाधारण स्त्री आरक्षित जागेबरोबर सर्वसाधारण पुरुष या जागेसाठीही महिलेला निवडणुकीत उभे करण्याची व्यूहरचना सुरू झाली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाल्यामुळे सर्वसाधारण पुरुष तर सर्वसाधारण ओबीसी जागेवर महिलांना पुढे केले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदेमध्ये महिलांची संख्या निम्म्यापेक्षा अधिक होणार असल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटात इच्छुकांची संख्या अधिक असते. यावेळी अध्यक्षपदच महिलासाठी राखीव असल्याने महिला उमेदवार असली तरच अध्यक्षपदासाठी किमान पात्र असणार आहेत. त्यासाठी सर्वसाधारण पुरूष असलेल्या ठिकाणीही महिला उभ्या केलेल्या बऱ्या, अशी मानसिकता काही खुल्या वर्गातील पुरुष उमेदवारांमध्ये पहायला मिळत आहे.
महायुतीमध्ये चुरस
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अध्यक्षपदासाठी स्पर्धा सुरू आहे. प्रत्येकाला महिला अध्यक्षपदासाठी आपलाही उमेदवार असावा, असे वाटते. त्यामुळे या गटातील मातब्बर उमेदवार खुल्या पुरुषाच्या ठिकाणी त्यांच्याच घरातील महिलांना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
ऐनवेळेला बदल झाल्यास मिळू शकते संधी
ऐनवेळी जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाची संधी नेत्यांच्या घरात देण्याऐवजी पक्ष वाढीसाठी एखाद्या वंचित भागाला अध्यक्षपद द्यायचे ठरल्यास सर्वसामान्यांनाही संधी मिळू शकते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार ऐनवेळी काहीही बदल होऊ शकतो. यासाठी किमान स्पर्धेसाठी पात्र तरी असावे, यासाठी महिलांनाच पुढे केले जाणार असल्याची चर्चा इच्छुक उमेदवारांकडून होत आहे.
नेत्यांचा असणार विधानसभा मतदारसंघावरही भर
जिह्यावर वर्चस्व निर्माण करणारे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा कागल, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील व भाजपचे आमदार अमल महाडिक यांचा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ, आमदार विनय कोरे यांचा पन्हाळा मतदारसंघ, ऐनवेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्याबरोबर इतरही आमदार दावेदार असू शकतात.
अध्यक्षपदासाठी महिलांचा आग्रह
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी संधी कमी वेळा येते, त्यामुळे महिलांकडून का असेना, घरात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद येऊ दे, अशी मानसिकता अनेक सर्वसाधारण गटात इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. यासाठी आता महिलांनाच पुढे करून संधी मिळते काय, यासाठी प्रयत्न करण्याचा मानसही अनेकांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच दावेदार
गतवेळच्या सर्भागृहात राष्ट्रीय काँग्रेसच्या १४ जागांवर जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. सध्या कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनीही जिल्ह्यात काँग्रेसचा गट मजबूत ठेवला आहे. त्यांच्याकडून तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या तयारीत आहेत.
त्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे गट कमी आहे. महाविकास व इंडिया आघाडीच्यावतीने जिल्ह्यात इतर पक्षांना सोबत घेत निवडणुका लढवल्या जाऊ शकतात. तरीही अध्यक्षपदासाठी काँग्रेस प्रबळ दावेदार असू शकतो.
निवडणुकीसाठी महिलांनी सर्व जागेवर तयारी करावी
"जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला यासाठी झाल्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांचा विकास होणार आहे. ग्रामीण भागातील योजनेत थेट महिलांचा संपर्क वाढवता येणार आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्व आरक्षित वर्गातील महिलांना संधी मिळणार आहे, त्यामुळे पुरुषाच्या आरक्षित जागेवर महिलांना निवडणुकीसाठी तयारी करावी."
- राजेश्री नामवेब ऊर्फ पोपट ढबण, माजी सभापती, महिला बालकल्याण सभापती, जि. प