For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ZP Election 2025 : कोल्हापुरात स्थानिक आघाड्या राजकीय पक्षांमध्ये होणार विलीन

05:10 PM May 11, 2025 IST | Snehal Patil
zp election 2025   कोल्हापुरात स्थानिक आघाड्या राजकीय पक्षांमध्ये होणार विलीन
Advertisement

 महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पहायला मिळणार

Advertisement

By : कृष्णात चौगले

कोल्हापूर : राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील राजकारणात अनेकदा गटा-तटाचे प्राबल्य राहिले आहे. पण गत विधानसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा चुरशीचा सामना रंगल्यामुळे अनेक स्थानिक गटांनी पक्षीय राजकारणात उडी घेतली आहे.

Advertisement

परिणामी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्येही अपवाद वगळता गटातटापेक्षा पक्षीय लढती होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणच्या स्थानिक आघाड्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमध्ये विलीन होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पहावयास मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास पाहता या निवडणुकांमध्ये छोट्या-मोठ्या घटक पक्षांना आणि अपक्षांना सोबत घेतल्या शिवाय सत्ता मिळाली नसल्याचे वास्तव आहे. पण जिह्यातील बहुतांशी गटांनी पक्षीय राजकारणाचा आसरा घेतल्यामुळे भूतकाळातील गट विसर्जित केले जाण्याची शक्यता आहे. आगामी राजकारणावर या गटांचा प्रभाव राहणार नाही.

पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती असो अथवा महापालिका, नगरपालिका या ठिकाणी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: बहुतांशी पक्षांकडूनही आपल्या चिन्हांवर निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक आघाड्यांसह गटातटाच्या राजकारणाला पायबंद बसणार आहे.

जि..च्या गत निवडणुकीत या गटांचे राहिले प्राबल्य

लोकसभा, विधानसभा वगळता जिह्यातील सहकारी संस्था असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. यामध्ये गटातटांचे प्राबल्य अधिकच राहिले. यामध्ये राजकीय पक्षांबरोबरच नरके, मंडलिक, कोरे, आवाडे, आबिटकर, चराटी, महाडिक, गडहिंग्लजचे शिंदे आदी गटांचा दबदबा कायम राहिला आहे. त्यांना वगळून जिह्याचे राजकारण करणे अशक्य आहे. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाला महत्त्व येणार आहे.

गटातटाच्या राजकारणाला येणार मर्यादा

माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची गत निवडणूक लढवली होती. पण सध्या राहुल आवाडे हे भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांना भाजपच्या कमळ या चिन्हावर आपले उमेदवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहेत. महाडिक गटानेही गत निवडणुकीत ताराराणी आघाडी पक्षाच्या माध्यमातून आपले तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते.

पण आता आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक हे दोन्ही भाजपचे नेते असल्यामुळे त्यांनाही भाजपच्या चिन्हावर आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. गत निवडणुकीत चंदगडच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी युवक क्रांती आघाडीच्या माध्यमातून दोन सदस्य जिल्हा परिषदेमध्ये पाठवले होते.

आगामी निवडणुकीत त्या कोणती भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे. तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शाहू महाआघाडीच्या माध्यमातून तत्कालिन निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती. आता मात्र पालकमंत्री या नात्याने शिवसेना शिंदे गटाचे त्यांच्याकडे पालकत्व असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हावर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे.

यासह शिवसेना शिंदे गटाच्या सर्व आमदारांनाही उमेदवारांच्या हातात धनुष्यबाण द्यावे लागणार आहे. पश्चिम पन्हाळ्यात मात्र शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि जनसुराज्यचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे हे दोन्ही पारंपरिक परस्पर विरोधातील नेते महायुतीत असल्यामुळे तेथे गटातटाचे राजकारण होण्याची शक्यता आहे.

  • आमदार चंद्रदीप नरके गट - 03
  • अपक्ष - 01
  • आमदार विनय कोरे गट - 06
  • शेतकरी संघटना - 02
  • माजी आमदार प्रकाश आवाडे गट - 02
  • माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर गट - 01
  • माजी आमदार उल्हास पाटील गट - 01
  • माजी आमदार संध्यादेवी कुपेकर गट - 02
  • माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर गट - 02
  • पालकमंत्री प्रकाश आबीटकर गट - 02
  • माजी खासदार संजय मंडलिक गट - 01
  • महाडिक गट - 03
  • भाजप - 14
  • काँग्रेस - 14
  • राष्ट्रवादी - 11
  • आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गट - 01
  • माजी आमदार संजयबाबा घाटगे गट - 01
Advertisement
Tags :

.