Kolhapur Politics: ZP अध्यक्ष, महापौर आमचाच, निवडणुकीपूर्वीच सेना, BJP कडून दावा
सत्ता आणि जागा वाटपावरुन भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरु
By : धीरज बरगे
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच आणि महापौरही आमचाच असा दावा निवडणुकीपूर्वीच भाजप, शिवसेना नेत्यांकडून सुरु आहे. निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचे नेत्यांकडून सांगितले जात असले तरी सत्ता आणि जागा वाटपावरुन भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सध्या तरी याबाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. सध्या तरी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल वाटत असले तरी पुढील काळात जागा वाटपावरुन त्रांगडे निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर दौऱ्यावर नुकतेच भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे येऊन गेल्या.
दौऱ्यावेळी या तिन्ही नेत्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी मंत्री पाटील, मंत्री सामंत यांनी जि. प. अध्यक्ष, महापौर आपल्याच पक्षाचा होईल असे वक्तव्य केले. महायुती म्हणुन निवडणूका लढल्या जाणार असल्या तरी सद्यस्थितीत नेत्यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे.
जागा वाटपा दरम्यान त्रांगडे
भाजप, शिवसेनेमध्ये सध्या माजी नगरसेवकांचे इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे भाजपने मागील निवडणुकीत जिंकलेल्या 33 जागांसह आणखी 12 जागा मागणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले आहे. तर मागील निवडणुकीत केवळ चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेनेही 40 जागांवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मागील निवडणुकीत 14 नगरसेवक असून 30 जागा लढविण्याची तयारी राष्ट्रवादीची सुरु आहे. त्यामुळे सध्यातरी या निवडणुकांवरुन महायुतीमध्ये शांतता दिसत असली तरी जागा वाटपा दरम्यान मात्र त्रांगडे निर्माण होणार आहे.
आत्मविश्वास वाढला, सत्ता येणार?
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे दहा पैकी दहा आमदार निवडून आल्यामुळे महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच सत्ता आमचीच येणार असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे. 2015 च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही भाजप, शिवसेनेचे आठ आमदार होते. तरीही जि.प.मध्ये काठावर तर महापलिकेत सत्तेपासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असला तरी त्यांच्या दाव्याप्रमाणे सत्ता येणार का हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
चढाओढीपासून राष्ट्रवादी काहीशी बाजूला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. नुकत्याच कोल्हापूरात येऊन गेलेल्या मंत्री तटकरे यांनी सत्ता, जागा किती लढणार याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. केवळ निष्ठावंत कार्यकर्त्यांनी संधी दिली जाणार असे सांगितले. महायुतीमध्ये निवडणुकांवरुन भाजप, शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या चढाओढीपासून राष्ट्रवादी काहीशी बाजूला असल्याचे दिसून येत आहे.
भाजप 45, शिवसेना 40 मग राष्ट्रवादीला काय?
महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु असली तरी वातावरण मात्र अद्याप शांत आहे. शिवसेना, भाजप मंत्र्यांकडून सत्तेचा दावा केला जात असुन भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकताच महापालिकेच्या 45 जागांवर दावा केला आहे. तर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वीचे 40 हुन अधिक जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुती म्हणुन निवडणुका लढणार जाणार असल्या तर भाजप 45 आणि शिवसेना 40 जागा लढणार असेल तर मग राष्ट्रावादी काँग्रेस काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.