तिमाही निकालानंतर झोमॅटोचे समभाग 17 टक्क्यांनी मजबूत
एप्रिल ते जून तिमाहीचा समावेश :कंपनीचा नफा 2 कोटी ते 253 कोटींपर्यंत वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे शेअर्स शुक्रवारी 17 टक्केपेक्षा अधिकने वाढत गेल्याचे दिसून आले आहे. एप्रिल-जून तिमाहीत, झोमॅटोचा नफा हा वर्षभराच्या आधारावर 126.5 पटीने वाढून 253 कोटी रुपये झाला आहे. याचा परिणाम समभागाने घेतलेल्या तेजीमधून पहावयास मिळत आहे.
वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 2 कोटी रुपये होता. झोमॅटोचा महसूल पहिल्या तिमाहीत 74 टक्क्यांनी वाढून 4,206 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत महसूल 2,416 कोटी रुपये होता. झोमॅटोने 1 ऑगस्ट रोजी आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.
झोमॅटो लवकरच डिस्ट्रिक्ट अॅप करणार लाँच
झोमॅटो लवकरच आपले नवीन अॅप लॉन्च करणार आहे. झोमॅटोनेच ही घोषणा केली आहे. या नवीन अॅपचे नाव ‘जिल्हा’(डिस्ट्रिक्ट) अॅप आहे. हे अॅप जेवण, चित्रपट आणि कार्यक्रमांसाठी तिकीट बुकिंगसह बाहेर जाण्याचा प्लॅनही एकत्रित करते. हे पाऊल झोमॅटोच्या प्लॅटफॉर्मवरील जीवनशैली सेवांच्या विस्तृत श्रेणीमध्ये प्रवेश करण्याचे संकेत देणारे आहे.