टाटा मोटर्स-बजाज ऑटोपेक्षाही झोमॅटो सरस ठरली
कंपनीचे बाजारमूल्य 2.78 लाख कोटींपर्यंत वाढले
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी झोमॅटो ही आता टाटा मोटर्स आणि बजाज ऑटोपेक्षा मोठी कंपनी बनली आहे. कंपनीचे बाजारमूल्य 2.78 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे या दोन वाहन उत्पादकांपेक्षा जास्त राहिले आहे. गुरुवारी ट्रेडिंगनंतर टाटा मोटर्सचे बीएसईवर बाजारमूल्य 2.73 लाख कोटी रुपये, तर बजाज ऑटोचे 2.50 लाख कोटी रुपये होते. या यशानंतर झोमॅटो देखील शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सेन्सेक्समध्ये सामील झाली आहे. इतर उर्वरीत 30 समभागांच्या या निर्देशांकातून जेएसडब्ल्यू स्टीलला वगळण्यात येईल. गेल्या महिन्यात बीएसईने याची घोषणा केली होती.
एका वर्षात 130 टक्के परतावा
2024 मध्ये झोमॅटोच्या समभागांच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती दुप्पट झाली आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी झोमॅटोच्या एका समभागाची किंमत 124 रुपये होती, जी आता 286 रुपयांवर पोहोचली आहे.
दुसऱ्या तिमाहीत नफा 388 टक्क्यांनी वाढला
आर्थिक वर्ष 2024-25 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत झोमॅटोचा नफा वार्षिक 388 टक्क्यांनी वाढून 176 कोटी झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 36 कोटी रुपये होता. कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत महसूल 68.50 टक्के वाढून 4,799 कोटी रुपये झाला.