झोमॅटोने केली 600 कर्मचाऱ्यांची कपात
मुंबई :
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने 600 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये या कर्मचाऱ्यांना कंपनीने सामावून घेतले होते.
झोमॅटोने दिलेल्या माहितीनुसार कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून वर्षभरापूर्वी सामील झालेल्या 600 कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले आहे. सदरच्या कर्मचाऱ्यांना झोमॅटो असोसिएट एक्सलरेटर प्रोग्राम अंतर्गत काम करण्याची संधी दिली होती. परंतु एक वर्षाच्या आतच कंपनीने कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वनोटीस न देता बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यानंतर सदरच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. अनेक कर्मचाऱ्यांना वर्षभरानंतर आपल्याला प्रमोशन मिळेल अशी खात्री वाटत होती.
काय होतं कारण
सदरच्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यासंदर्भातले कारण कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यानुसार खराब प्रदर्शन, अनुशासन न पाळणे ही कारणे कंपनीने सांगितली आहेत. अलीकडच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. झोमॅटोने ग्राहक सेवा अधिक चांगली करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सेवेचा वापर करण्यास सुरुवात केली होती.
प्लॅटफॉर्ममुळे कर्मचाऱ्यांना फटका
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने कंपनीने नगेट हा प्लॅटफॉर्म सुरू केला होता. या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला जवळपास दीड कोटी ग्राहकांशी कंपनी संपर्क साधून होती. या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर ग्राहक आपले प्रश्न विचारून प्रश्नांचे समाधान करून घेत होते. याकरिता याची मदत घेतली जात होती.