झिम्बाब्वेचा टी-20 मध्ये नवा विश्वविक्रम
20 षटकांत तडकावल्या 344 धावा, रझाच्या 43 चेंडूत नाबाद 133 धावा
वृत्तसंस्था/ नैरोबी
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय सर्वाधिक धावांचा नवा विश्वविक्रम नोंदवताना टी-20 विश्वचषक उपविभागीय आफ्रिका पात्रता स्पर्धेतील सामन्यात 20 षटकांत 4 बाद 344 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार सिकंदर रझाने केवळ 43 चेंडूत नाबाद 133 धावा झोडपताना 7 चौकार, 15 षटकार हाणले. नंतर गाम्बियाचा डाव केवळ 54 धावांत आटोपला.
झिम्बाब्वेने नवा विश्वविक्रम नोंदवताना याआधी नेपाळने मंगोलियाविरुद्ध 314 धावांचा नेंदवलेला विश्वविक्रम मागे टाकला. संघाबरोबरच कर्णधार सिकंदर रझाचे नावही रेकॉर्डबुकमध्ये नोंदले गेले. टी-20 मध्ये शतक नोंदवणारा झिम्बाब्वेचा तो पहिला फलंदाज बनला आहे. गांबियाच्या गोलंदाजावर त्याने पूर्ण वर्चस्व गाजवत तुफानी फटकेबाजी केली. कसोटी खेळणाऱ्या देशांतर्फे त्याने सर्वात वेगवान शतक नेंदवले. शतकी मजल मारण्यासाठी त्याने केवळ 33 चेंडू घेतले. एकंदर फलंदाजांमध्ये जलद शतक नेंदवणारा तो संयुक्त दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.
याशिवाय सलामीवीर ब्रायन बेनेटने 26 चेंडूत 50, तडिवानाशे मरुमनीने 19 चेंडूत 62, रेयान बर्टने 11 चेंडूत 25, क्लाईव्ह मदांदेने 17 चेंडूत नाबाद 53 धावा झोडपल्या. गांबियातर्फे आंद्रे जार्जूने 2, अर्जुनसिंग राजपुरोहित, बुबाकर कुयातेह यांनी एकेक बळी मिळविले. झिम्बाब्वेने या सामन्यात एकूण 27 षटकार, 30 चौकार ठोकले. गांबियाचा गोलंदाज मुसा जोबार्तेह हा टी-20 मधील सर्वात महागडा ठरलेला गोलंदाज बनला आहे. त्याने 4 षटकांत 93 धावा दिल्या. त्यानंतर गांबियाचा डाव 54 धावांत आटोपल्याने झिम्बाब्वेला 290 धावांनी दणदणीत विजय मिळाला.
संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे 20 षटकांत 4 बाद 344, गांबिया 14.4 षटकांत सर्व बाद 54.