झिम्बाब्वे संघाला 63 धावांची आघाडी
दुसरी कसोटी, सिकंदर रझा, इर्व्हिन यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / बुलावायो
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी यजमान झिम्बाब्वेने अफगाणवर 63 धावांची आघाडी मिळविली आहे. शुक्रवारी चहापानानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी झिम्बाब्वेने पहिल्या डावात 66 षटकात 8 बाद 220 धावा जमविल्या होत्या. सिकंदर रझा आणि कर्णधार इर्व्हिन शानदार अर्धशतके नोंदवून संघाचा डाव सांभाळला.
या कसोटीमध्ये अफगाणचा पहिला डाव 44.3 षटकात 157 धावांत आटोपला. अफगाणच्या पहिल्या डावात एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडताना आला नाही. अफगाण संघातील रशीद खानने 4 चौकारांसह 25, रेहमत शहाने 3 चौकारांसह 19, फरिद अहम्मदने 1 चौकार आणि 1 षटकारासह 17, अब्दुल मलिकने 1 चौकारासह 17, रियाज हसनने 1 चौकारांसह 12, कर्णधार शाहीदीने 2 चौकारांसह 14, अपसर झेझाईने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. झिम्बाब्वेतर्फे न्यामहुरी आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी 3 तर मुझारबनीने 2 आणि निगरेव्हाने 1 गडी बाद केला.
झिम्बाब्वेच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. त्यांचे 4 फलंदाज केवळ 41 धावांत बाद झाले. त्यानंतर सिकंदर रझा आणि कर्णधार इर्व्हिन यांनी पाचव्या गड्यासाठी 71 धावांची भागिदारी केली. सिकंदर रझाने 104 चेंडूत 6 चौकारांसह 61 धावा केल्या. कर्णधार इर्व्हिन 4 चौकारांसह 57 धावांवर खेळत आहे. सिन विलियमसने इर्व्हिनसमवेत आठव्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केल्याने झिम्बाब्वेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. इर्व्हिन 4 चौकारांसह 57 धावांवर खेळत आहे. विलियमसने 52 चेंडूत 8 चौकारांसह 49 धावा झळकविल्या. चहापानावेळी झिम्बाब्वेने 63 षटकात 7 बाद 210 धावा जमविल्या होत्या. चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात आणखीन 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आला आणि झिम्बाब्वेने 66 षटकात 8 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली होती. अफगाणतर्फे रशिद खानने 80 धावांत 3 तर अहम्मदझाई आणि फरिद अहम्मद यांनी प्रत्येकी 2 आणि झिया ऊर रेहमानने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : अफगाण प. डाव 44.3 षटकात सर्वबाद 157, झिम्बाब्वे प. डाव 66 षटकात 8 बाद 220 (सिकंदर रझा 61, इर्व्हिन खेळत आहे 57, विलियमस 49, अवांतर 12, रशिद खान 3-80, फरिद अहम्मद 2-27, अहम्मदझाई 2-56, झिया ऊर रेहमान 1-29)