झेडपीचे 70 कोटींचे पुरवणी बजेट मंजूर
सातारा :
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी सातारा जिल्हा परिषदेचा स्वउत्पन्नाचा 2025-26 सालचा 69 कोटी 88 लाख 81 हजार रुपयांचा पुरवणी अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या ठराव समितीत सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात मूळ अंदाजपत्रक 39 कोटी 40 लाखाचे मंजूर केले होते तर पुरवणी अंदाजपत्रक 69 कोटी 88 लाख 81 हजाराचे मंजूर केल्याने एकूण जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 109 कोटी 28 लाख 81 हजार रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे. बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत विभागास ज्याची तरतूद करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या पुरवणी अंदाजपत्रकाच्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे निलेश घुले, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्कर्ष कवठेकर, वित्त विभागाचे लेखाधिकारी योगेश करंजेकर, कनिष्ठ लेखाधिकारी व्ही. एन. काटकर, वरिष्ठ सहा लेखाधिकारी जयंत माळी आदी उपस्थित होते.
पुरवणी अंदाजपत्रकात सामान्य प्रशासन विभागाच्या मानधनासाठी 40 लाख, सादिल खर्चासाठी 1 कोटी 35 लाख, शिक्षण विभागासाठी 7 कोटी 14 लाख 90 हजार, प्राथमिक शाळा देखभाल दुरुस्ती 5 टक्केकरता 3 कोटी 38 लाख 25 हजार, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी 30 लाख, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाकरता 10 लाख, केंद्र शाळास्तरावर क्रीडा स्पर्धाकरता 35 लाख, प्रत्येक तालुक्यात एक मॉडेल स्कूलकरता 3 कोटी 57 लाख 73 हजार, नवीन लेखाशिर्ष नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शाळा खोल्या बांधण्याकरता 1 कोटी, लघु पाटबंधारेसाठी 2 कोटी 88 लाख 8 हजार, त्यात देखभाल व दुरुस्ती व स्त्राsत बळकटीकरणासाठी 2 कोटी 86 लाख 4 हजार, बांधकाम विभागासाठी 22 कोटी 47 लाख 67 हजार, त्यात जिल्हा परिषद कार्यालयीन इमारत देखभाल व दुरुस्तीकरता 1 कोटी 80 लाख, पंचायत समिती इमारत देखभाल व दुरुस्तीकरता 2 कोटी 90 लाख, ग्रामीण भागातील मूळ अपूर्ण रस्त्यांच्या कामाकरता 2 कोटी 23 लाख 50 हजार, ग्रामीण भागातील इमारतींची मूळ व अपूर्ण कामाकरता 2 कोटी 37 लाख, आयुर्वेदसाठी 20 लाख व आरोग्य विभागासाठी 6 कोटी 69 लाख 21 हजार, त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठ्यासाठी 96 लाख 74 हजार, आरोग्य उपाययोजनासाठी 38 लाख 60 हजार, नाविण्यपूर्ण योजनेसाठी 4 कोटी 20 लाख 68 हजार, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकीसाठी 1 कोटी, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी 1 कोटी, कृषी विभागासाठी 2 कोटी 40 लाख, शेतकऱ्यांना इंर्पोटेड, एचटीपी, नॅपसॅक स्प्रे पंपच्या अनुदानासाठी 5 लाख, नाविण्यपूर्ण योजनाकरता 15 लाख, पॉवर विडरसाठी अनुदान देण्याकरता लेखाशिर्षखाली 15 लाख, तसेच कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन देण्यासाठी 38 लाख, पशुसंवर्धन विभागासाठी 2 कोटी 62 लाख 47 हजार, त्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांना औषध पुरवठ्यासाठी 50 लाख, पशुवैद्यकीय दवाखाने व उपकेंद्र इमारती दुरुस्तीसासाठी 27 लाख 47 हजार, वंध्यत्व निवारण शिबिरासाठी 40 लाख, जंतनाशक औषध पुरवठ्यासाठी 40 लाख, समाजकल्याण विभागासाठी 8 कोटी 1 हजार तसेच दिव्यांगांकरता 3 कोटी 29 लाख 28 हजार, मागासवर्गीय वस्तीत जोडरस्त्यांकरता 3 कोटी 66 लाख 25 हजार, समाजमंदिर बांधकाम दुरुस्तीसाठी 1 कोटी 25 लाख 36 हजार, मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिनसाठी 77 लाख, नाविण्यपूर्ण योजनांसाठी 1 कोटी 94 लाख 90 हजार, 5 टक्के दिव्यांग कल्याणमध्ये नाविण्यपूर्ण योजनाखाली 96 लाख 5 हजार, झेरॉक्स मशिनकरता 70 लाख, संकीर्णमध्ये 2 कोटी 30 लाख, घसारा निधी 50 लाख, आपत्त्कालीन व्यवस्था करण्यासाठी राखीव निधी म्हणून 1 कोटी 77 लाख 37 हजार, संकीर्ण ग्रामपंचायतसाठी 20 कोटी 95 लाख 10 हजार, मुद्रांक शुल्कसाठी 11 कोटी 47 लाख 70 हजार, पंचायत समितींना देय प्रोत्साहनपर अनुदान वाटपासाठी 25 लाख 68 हजार, नाविण्यपूर्ण योजनासाठी 25 लाख, त्रिशंकू भागातील विकास कामाकरता 35 लाख, संकीर्ण वित्त करता 19 कोटी 40 लाख 46 हजार, त्यात व्यपगत ठेवी व लेखासदरीसाठी 17 कोटी 99 लाख 8 हजार, महिला व बालकल्याण विभागासाठी 4 कोटी 57 लाख, अंगणवाडी इमारत बांधकाम, भाडे, दुरुस्तीसाठी 2 कोटी 5 लाख 94 हजार, महिलांना पिठाची चक्कीसाठी 21 लाख 76 हजार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी 30 लाख अशी तरतूद करुन 1 लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
विभाग तरतूद (लाखात)
सामान्य प्रशासन 85
शिक्षण 794.65
बांधकाम 1417.67
ल.पा. 248.08
आरोग्य 544.21
कृषी 140
पशुसंवर्धन 162.47
वने 7
समाजकल्याण 736.79
सामूहिक विकास 0
संकीर्ण 163
सं.ग्रामपंचायत 516.49
सं.वित्त 1813.45
म.बा.क. 310
ए.बा.वि.प. 0
सा.आरोग्य अभियांत्रिकी 50
एकुण 6988.81