ZP Constituency: खुल्या मतदारसंघावर अनेकांचा डोळा, कागलमध्ये इच्छुकांच्या हालचाली वाढल्या
कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचा बानगे हा एक मतदारसंघ वाढला होता
By : सदाशिव आंबोशे
सेनापती कापशी : कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 मतदार संघ होऊन म्हाकवे हा सहावा नव्याने जिल्हा परिषद मतदार संघ तयार झाला आहे. त्यामुळे साहजिकच पंचायत समितीचे 10 ऐवजी आता 12 गण तयार झाले आहेत. आता सर्व हरकती वगैरे पूर्ण झाल्याने यामध्ये आता कोणताच बदल होणार नाही, याची खात्री झाल्याने इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. खुल्या मतदारसय्ंघावर अनेकांचा डोळा असून आपल्या उमेदवारीसाठी आतापासूनच तयारी सुरू आहे. संपर्क दौरे ही वाढले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत संपून तीन वर्षे उलटून गेली तरी निवडणूक काय लागली नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक असूनही संधी मिळत नव्हती. कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचा बानगे हा एक मतदारसंघ वाढला होता.
म्हाकवे ग्रामस्थांनी हरकती घेत आपली ताकद पणाला लावून म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघ तयार करण्यास भाग पाडले. त्यानंतर बानगे ग्रामस्थांनीही आक्रमकतेचा पवित्रा घेत बानगे हाच जिल्हा परिषद मतदार संघ राहिला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले. तसे त्यांनी निवेदनही दिले आहे, मात्र त्याचा फारसा परिणाम होईल असे दिसत नाही.
म्हाकवे गाव सिद्धनेर्ली मतदार संघात समाविष्ट करून म्हाकवे पंचायत समिती गण जाहीर केला होता. याला म्हाकवे ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघ बचाव समिती स्थापन केली होती. म्हाकवे हे या मतदारसंघातील लोकसंख्येने मोठे असणारे गाव आहे.
शिवाय नैसर्गिक संलग्नता डावलून सिद्धनेर्ली परिसरात या गावाला जोडणे चुकीचे आहे. ही बाब म्हाकवे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. मतदार संख्येचाही एकूणच आलेख बिघडल्याने म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघ होणे गरजेचे आहे. हे त्यांनी संबंधितांच्या लक्षात आणून दिले.
त्यामुळे आता बाणगे ऐवजी म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघ करून सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघात थोडा बदल केलेला आहे. म्हाकवे गाव सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघातून बाजूला केल्याने व त्या नावाने नवा जिल्हा परिषद मतदार संघ तयार केल्याने साहजिकच तेथे साके पंचायत समिती गण तयार करावा लागला.
बामणी, व्हनाळी, सावर्डे खुर्द, पिंपळगाव बुद्रुक, केनवडे, गोरंबे ही गावे या पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट करण्यात आली. तर शंकरवाडी हे गाव आता मौजे सांगाव पंचायत समिती मतदार गणाऐवजी सिद्धनेर्ली पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे येथील विसंगती टळली आहे.
हळदवडे गाव हळदी पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट व्हावे, अशी हरकतही फेटाळली आहे. तसेच जैन्याळकरांची सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघाला जोडावे, ही मागणीही फेटाळली आहे. हे गाव नानीबाई चिखली मतदारसंघात आणि हळदी गणात आहे तसे ठेवले आहे.
तालुक्यातील जि. प. मतदार संघ आणि पंचायत समिती गण
कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदार संघ (कसबा सांगाव आणि मौजे सांगाव पंचायत समिती गण), सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघ (सिद्धनेर्ली आणि साके पंचायत समिती गण), म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघ (म्हाकवे आणि यमगे पंचायत समिती गण), नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघ (नानीबाई चिखली आणि हळदी पंचायत समिती गण), बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघ (बोरवडे आणि सावर्डे बुद्रुक प. समिती गण), सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघ (सेनापती कापशी आणि माद्याळ पंचायत समिती गण).
दोन पंचायत समिती गण...
तालुक्यात 1 जिल्हा परिषद मतदार संघ वाढल्याने आता नव्याने 2 पंचायत समिती गण तयार झाले आहेत. यामध्ये सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघात साके तर नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदारसंघात हळदी असे दोन पंचायत समिती गण तयार झाले आहेत.
तालुक्यातील जि. प. मतदार संघ आणि पंचायत समिती गण
कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदार संघ (कसबा सांगाव आणि मौजे सांगाव पंचायत समिती गण), सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघ (सिद्धनेर्ली आणि साके पंचायत समिती गण), म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघ (म्हाकवे आणि यमगे पंचायत समिती गण), नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघ (नानीबाई चिखली आणि हळदी पंचायत समिती गण), बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघ (बोरवडे आणि सावर्डे बुद्रुक प. समिती गण), सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघ (सेनापती कापशी आणि माद्याळ पंचायत समिती गण).