Political News: जिल्हा परिषदेतील स्थानिक आघाड्या संपुष्टात येणार की आघाडी होणार?
यावेळच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार?
By : प्रशांत चुयेकर
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहात स्थानिक आघाड्यांचे 10 सदस्य होते. या आघाड्यांचे नेतृत्व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, नंदा बाभूळकर आदींनी केले होते. ही मंडळी आता राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांच्या मोठ्या पदावर काम करीत आहेत.
त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. आगामी निवडणुका पक्षातर्फेच लढविल्या जातील. सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शाहू आघाडीचे उमेदवार यावेळी शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढतील.
शिवसेना, तर भाजपचे आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक यांचे उमेदवारही भाजपमधून मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. चंदगड येथील युवक क्रांती आघाडीच्या नंदा बाभूळकर सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत तर गोपाळराव पाटील आणि संभाजीराव देसाई शिरोलीकर हे सध्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आहेत. तर अपक्ष रसिका अमर पाटील या आ. सतेज पाटील यांच्या महाविकास आघाडीबरोबर आहेत. आजऱ्याचे अशोक चराटी हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.
जबाबदारीच्या पदामुळे पक्षाला पसंती
जिल्हा परिषदेच्या गतवेळच्या निवडणुकीतील पदाधिकारी आता राष्ट्रीय पक्षाच्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. पक्षामुळे मंत्री, आमदार यासह त्या पक्षाचे जिह्याच्या पदावर कार्यरत असल्यामुळे पक्षालाच पसंती देत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
संधी न मिळाल्यास होणार आघाडी
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकासकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांची उमेदवारी न मिळाल्यास काही ठिकाणी स्थानिक आघाडी होऊ शकते, असा अंदाजही कार्यकर्त्यांमधून वर्तविला जात आहे.
शिवसेनेचे उमेदवार असतील
"शिवसेनेने जिह्यासाठी खूप काही दिले आहे. प्रकाश आबिटकर यांना सार्वजनिक आरोग्यमंत्रीपदासह कोल्हापूरचे पालकमंत्रीपदीही दिले आहे. त्यामुळे साहजिकच यावेळी कोणतीही आघाडी नाही. जिल्हा परिषदेची निवडणूक ही शिवसेनेकडून लढवली जाईल."
- अर्जुन आबिटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य
भाजपमधून जिल्हा परिषदेची निवडणूक
"गतवेळच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक राजकारण विचारात घेऊन कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीची स्थापना केली होती. सध्या मी भाजपचा आमदार आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आघाडी विसर्जीत करून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार."
- आमदार राहुल आवाडे
गतवेळच्या सभागृहातील स्थानिक आघाडीचे सदस्य
- पालकमंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शाहू महाआघाडी (किल्ले पन्हाळा पार्टी) - रोहिणी आबिटकर, स्वरुपाराणी जाधव.
- माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी : वंदना मगदूम, राहुल आवाडे
- आ. अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडी पक्ष - रेखा हत्तरगी, राणी खमलेट्टी.
- नंदा बाभूळकर, काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील युवक क्रांती आघाडी : कल्लाप्पा भोगन, विद्या पाटील,
- भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी पक्ष : सुनिता रेडेकर
- अपक्ष : रसिका अमर पाटील