झीरो माईलस्टोन सुशोभीकरणास प्रारंभ
सातारा :
सातारा शहराची जेथून सुरुवात होते तो झीरो माईल स्टोन फुटपाथमध्ये दडला गेला होता. जेव्हा शिवतीर्थाचे सुशोभीकरणाचे काम सातारा पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आले, तेव्हा याच माईल स्टोनबाबत सातारा पालिकेच्या अभियंत्यांना याची माहिती मिळाली. त्यानुसार सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी हा माईलस्टोन सातारा शहराची एक ओळख वाढवणारा असल्याने नव्याने सुशोभीत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या कामास सुरुवात झाली आहे.
सातारा शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेले आहे. याच सातारा शहराची पूर्वीची वेस ही पोवई नाका अशी संबोधली जात असायची. त्याच ठिकाणी झीरो माईल स्टोन हा पोस्टाच्या भिंतीला लागूनच होता. त्याबाबतची माहिती सातारा पालिकेला शिवतीर्थाच्या नूतनीकरणाच्या कामावेळी समजली. त्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी झीरो माईल स्टोनचे काम करण्याबाबत सूचित केले. झीरो माईल स्टोन हा साताऱ्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक अशी ओळख आहे. त्या कामाच्या नूतनीकरणामुळे साताऱ्याच्या शिवतीर्थ परिसराला आणखी एक वेगळी प्रतिमा मिळणार आहे. हे काम मंगळवारपासून सातारा नगरपालिकेने हाती घेतले आहे. तत्पूर्वी या कामाची पाहणी मुख्याधिकारी अभिजित बापट आणि अभियंता दिलीप चिद्रे यांनी केली. त्यामुळे पोवई नाका परिसरात शिवतीर्थ, सेल्फी पाँईंट आणि झीरो माईल स्टोन ही तीन महत्वाच्या बाबी सातारकरांसाठी आकर्षण ठरणार आहेत..