जिल्ह्यात यंदा एचआयव्ही पॉझिटिव्ह नवजात शिशू नोंद शुन्य..
आईकडून बाळाला होणाऱ्या एचआयव्हीचे प्रमाण 0.03 टक्क्यावर
गतवर्षी आईकडून बाळाला एचआयव्ही संसर्गाच्या परजिल्ह्यातील दोन घटना नोंद
९ महिन्यात एचआयव्ही संक्रमित शिशूची एकही नोंद नाही
जागतिक एडस् जनजागृती दिन विशेष
कोल्हापूर : कृष्णात पुरेकर
जिल्ह्यात गेल्या 10 वर्षातील गर्भवतीकडून बाळाला एचआयव्ही संक्रमण होण्याचे प्रमाण यावर्षी एप्रिलपासून शुन्यावर आले आहे. गतवर्षी परजिल्ह्यातून आलेल्या एचआयव्ही संसर्गित मातांची दोन बाळे एचआयव्ही पॉझिटिव्ह आली होती. जिल्ह्यात मातेकडून बाळाला होणारे एचआयव्ही संक्रमणाचे प्रमाण 2014 मध्ये 0.04 टक्के होते. ते यावर्षी 0.01 टक्क्यावर आले आहे. एप्रिलपासून तर अशा नवजात संक्रमित बाळाची नोंद आजपर्यत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी, 1 डिसेंबरला जागतिक एडस् जनजागृती दिन आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून एचआयव्ही नियंत्रणातील ही प्रगती समोर आली आहे.
जिल्ह्यात जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, सेवा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, महापालिकांची हॉस्पिटल्समधून एचआयव्हीसंदर्भात समुपदेशन केले जाते. तेथे आयसीटीसी केंद्रे कार्यान्वित आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतही एचआयव्ही तपासणी मोफत केली जात आहे. वर्षभरात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत इंडेक्स टेस्टींग अभियान राबवले. या अभियानात एचआयव्ही संसर्गितांचे जोडीदार, त्यांच्या मुलांची एचआयव्ही तपासणी केली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आल्या. याद्वारे 250 गावांतील साडेसहा हजार जणांची तपासणी करून त्यांच्यात जागृती करण्यात आल्याची माहिती जिल्हा एडस् नियंत्रण केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी दिली.
जिल्ह्यात मातेकडून बाळाला होणारे एचआयव्ही संक्रमणाचे प्रमाण कमी करण्यासाठी इपीटीसीटी प्रोग्राम राबवला. यामध्ये हायरिस्क असलेल्या गर्भवतींचे तपासणीनंतर वर्गीकरण केले. यामध्ये गर्भवतींची 32 आठवड्यात व्हायरल टेस्ट केली जाते. या टेस्टनंतर येणारे प्रमाण 1 हजार पेक्षा जास्त असेल तर तिच्यापासून होणारे बाळही हायरिस्क मानले जाते. यात पुन्हा एआरटी औषध घेणाऱ्या ते औषध अनियमित घेणाऱ्या अन् मध्येच औषधे बंद करणाऱ्या गर्भवतींचा समावेश आहे. या गर्भवतींची तीनदा तपासणी केली जाते. अशा तपासणीमुळे आईकडून बाळाला एचआयव्ही संक्रमण होण्यांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. यात प्रसुतीपुर्वी 4 आठवडे आधी मातेची तपासणी करून हायरिस्क म्हणून तिचे वर्गीकरण केले जाते.
एचआयव्ही बाधित मातेकडून जन्मलेल्या नवजात बाळाची पहिली तपासणी 6 आठवड्यात, दुसरी तपासणी 6 महिन्यानंतर, तिसरी तपासणी 12 महिन्यानंतर आणि चौथी तपासणी 19 महिन्यानंतर केली जाते. यामध्ये एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यास ते बाळ एचआयव्ही मुक्त मानले जाते. या चार तपासणीनंतरही बाळाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या रक्ताचे दोन नमुने पुण्यातील ‘नारी’ संस्थेला तपासणी पाठवले जात असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात 2017-18 मध्ये 80 हजार 526 गर्भवतींची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यामध्ये नव्याने संसर्गित झालेल्या 34 गर्भवती आढळल्या होत्या तर एचआयव्ही संसर्गित 24 गर्भवती आढळल्या. त्यामुळे संसर्गित गर्भवतींची संख्या 58 होती. त्यातही 53 एचआयव्ही संसर्गित मातांची प्रसुती झाली. तर त्यांच्यापासून 51 शिशूंचा जन्म झाला. त्या बाळांच्या 19 महिन्यानंतरच्य तपासणीनंतर ती निगेटिव्ह आली. 2024-25 मध्ये त्यातही 24 ऑक्टोंबरअखेर जिल्ह्यात 40 हजार 572 गर्भवतींची एचआयव्ही तपासणी केली. यामध्ये नव्याने संसर्गित झालेल्या 13 गर्भवती आढळल्या तर एचआयव्ही संसर्गित 39 गर्भवती आढळल्या. त्यामुळे संसर्गित गर्भवतींची संख्या 52 होती. त्यातही 38 एचआयव्ही संसर्गित मातांची प्रसुती झाली. तर त्यांच्यापासून 37 शिशूंचा जन्म झाला. त्या बाळांच्या 19 महिन्यानंतरच्य तपासणीनंतर ती निगेटिव्ह आली. पण एप्रिलपासून एचआयव्हीबाधीत मातेकडून जन्मलेल्या संसर्गित बाळाची नोंद निरंक राहिली आहे.
एडस् जनजागृतीदिनी उद्या विविध उपक्रमांचे आयोजन
संसर्गित मातेकडून बाळाला देण्यात येणाऱ्या दुधासंदर्भात अफास (एएफएएसएस) प्रणाली वापरली जात आहे. यामध्ये प्रसुतीनंतर 32 आठवड्यात व्हायरल लोडचे प्रमाण मातेमध्ये 1 हजार एमएलपेक्षा अधिक असल्याचे अफास प्राणली वापरली जाते. यामध्ये आईचे दुध स्वाकारार्ह, व्यवहार्य, बाहेरचे दुध परवडणारे, टिकाऊ आणि सुरक्षित असे मानले जाते. यावर्षी एचआयव्ही जनजागृतीसाठी मार्ग हक्काचा आणि सन्मानाचा (टेक दी राईट पाथ) ही थीम घेण्यात आली आहे. याअंतर्गत 1 डिसेंबरला प्रभातफेरी, पथनाट्या, शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने, चित्रकला, पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी दिली.