For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकीय आरक्षणासाठी एसटी समाजातील ‘झेन झी’ आक्रमक

06:06 AM Aug 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजकीय आरक्षणासाठी  एसटी समाजातील ‘झेन झी’ आक्रमक
Advertisement

फर्मागुडीतील युवा मेळाव्यात ‘चलो पणजी’साठी हाक : कटमगाळ दादांना गाऱ्हाणे

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

फोंडा : राज्यातील एसटी समाजाची प्रमुख मागणी असलेल्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आता समाजातील ‘झेन झी’ अर्थात युवांनीही पुढाकार घेतला आहे. 2027 च्या निवडणुकीतच आरक्षण लागू व्हावे यासाठी येत्या 13 ऑगस्ट रोजी पणजीच्या आझाद मैदानावर नियोजित महासभेला मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याची हाक युवांनी समाजबांधवांना दिली आहे.

Advertisement

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून फर्मागुडी येथील गोपाळ गणपती सभागृहात रविवारी उटा संघटनेतर्फे आयोजित केलेल्या युवा मेळाव्याला मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता. राजकीय आरक्षण हा आमच्यासाठी निव्वळ राजकीय मुद्दा नसून त्यामागे युवा पिढीचे भवितव्य असल्याचे विचार एसटी समाजातील युवा युवतींनी या व्यासपीठावऊन मांडले. सभापती डॉ. गणेश गावकर, आमदार गोविंद गावडे यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.

नोटिफिकेशन म्हणजे अंतिम विजय नाही

राजकीय आरक्षणासंबंधी निघालेले नोटिफिकेशन म्हणजे पूर्ण विजय नाही. या भ्रमात न राहता त्यासंबंधी सर्व प्रक्रिया जलदगतीने व्हावी व येणाऱ्या 2027 मध्ये आरक्षण लागू होण्यासाठी संघटीतपणे पाठपुरावा करण्याचे आवाहन युवा प्रतिनिधींनी केले. मुख्यमंत्री व सरकारकडून आम्हाला केवळ आश्वासने नकोत, आमचा संविधानिक हक्क विनाविलंब द्यावा लागेल. आमचा आवाज सरकारला ऐकून घ्यावाच, लागेल. आरक्षणाच्या नोटिफिकेशनबद्दल आम्ही ‘झेन झी’ युवक सरकारचे अभिनंदन करीत आहोत. पण त्यापुढची प्रक्रिया म्हणजेच मतदार पुर्नरचना, जातीनिहाय जनगणना व त्यातील इतर टप्पे पूर्ण कऊन अंतिम नोटीफिकेशन केंद्रीय निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागेल. समाजमाध्यमातून युवावर्ग संघटित झाला असून हा लढा निर्णायक टप्प्यापर्यंत पोचविण्यासाठी सर्व स्तरावरील समाजबांधवांनी या चळवळीला पाठिंबा व सहकार्य करण्याचे आवाहन या मेळाव्यातून करण्यात आले. येत्या 13 ऑगस्ट रोजी ‘चलो पणजी’ ही महासभा यशस्वी करण्याची हाकही यावेळी देण्यात आली. मेघराज आकारकर, शशिकांत गावकर, श्रवणी गोविंद गावडे, अशिता गावडे व अन्य युवा युवतींनी यावेळी राजकीय आरक्षणावर युवकांचे विचार व भूमिका मांडली.

युवांची कनेक्टिविटी हेच मोठे यश : गणेश गावकर

मेळाव्याला मार्गदर्शन करताना सभापती गणेश गावकर म्हणाले की, समाजातील युवावर्गाची कनेक्टिविटी ही जाणिवच या चळवळीचे मोठे यश आहे. राजकीय आरक्षण तर मिळणारच पण ते पुढे टिकवून ठेवण्यासाठी ठोस आराखडाही तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक घटकाच्या उत्कर्षासाठी आणि सामाजिक न्यायासाठी त्याचे घटनात्मक हक्क मिळालेच पाहिजेत.

युवांची बुद्धिमत्ता, एकता चळवळीला बळ देईल : गोविंद गावडे

आमदार गोविंद गावडे यांनी समाजाच्या हक्कासाठी पुढे सरसावलेल्या युवावर्गाचे खास अभिनंदन केले. 13 ऑगस्टच्या महासभेचा विषय प्रत्येक घरापर्यंत पोचलेला आहे. आमच्या लढ्यातील धगधगत्या आगीची राख होऊ द्यायची नाही. समाजातील झेन झीचा आवाज गोव्याच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. युवकांनी पुढाकार घेतल्यास कुठलीही क्रांती यशस्वी होते, हा आजवरचा इतिहास आहे. एसटी समाजातील युवकांच्या भवितव्यासाठी त्यांना शिक्षण, रोजगार व अन्य विविध क्षेत्रात ही जागृती कायम ठेवावी लागेल. युवामधील बुद्धिमत्ता, एकता आणि जबाबदारीचे भान खऱ्या अर्थाने या चळवळीला दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चळवळ सुऊच ठेवावी लागेल : प्रकाश वेळीप

मेळाव्यापूर्वी उटा संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी फर्मागुडी येथील श्री कटमगाळ देवस्थानमध्ये जाऊन राजकीय आरक्षण धसास लागावे, यासाठी गाऱ्हाणे घातले.  सरकारला सुबुद्धी लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. प्रकाश वेळीप म्हणाले, केंद्रात राजकीय आरक्षण जाहीर होऊन वर्ष झाले तरी नोटिफिकेशन निघत नसल्याने उटाच्या माध्यमातून सर्व समाजबांधवांना पुन्हा लढ्यासाठी हाक द्यावी लागली. दोन महिने वाड्यावाड्यांवर जाऊन जागृती करावी लागली. त्यानंतर 6 ऑगस्टला नोटिफिकेशन निघाले. पण प्रत्यक्ष 2027 च्या निवडणुकीत आरक्षण लागू होण्यासाठी जे महत्त्वाचे टप्पे आहेत, ते पूर्ण होण्यासाठी चळवळ सुऊच ठेवावी लागेल.

Advertisement
Tags :

.