महासत्तांच्या मनोमिलनात झेलेन्स्कीचे तीनतेरा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे नेते वोलोदोमीर झेलेन्स्की यांचा पार पालापाचोळा केला आहे. बायडेन शासनकाळात जागतिक मंचावरील खास पाहुणचार घेणाऱ्या झेलेन्स्कीला आता काडीचीही किंमत राहिलेली नाही. नाटो सदस्यत्व मिळविण्याच्या लालसेने झेलेन्स्कीने आपल्या देशाची राखरांगोळी करुन ठेवलेली आहे. त्याच्या या आत्मघातकी निर्णयामुळेच आज झेलेन्स्कीची स्थिती शून्यवत झालेली आहे.
रशियाच्या सहभागाशिवाय रशिया व युक्रेन युद्धावर मार्ग निघणे कठिण असल्याचे ठणकावून सांगत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2023 मध्ये स्विर्त्झलँडमधील जागतिक शांती परिषदेत सहभागी होण्यास नकार दर्शविला होता. त्यावेळी भारत सरकारवर अमेरिकेसहीत युरोपियन देशांनी प्रचंड टीका केली होती. आता अमेरिकेनेच रशियाबरोबर युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याचा निर्णय घेऊन कार्यवाही सुरु केली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हे अमेरिकन सिनेटरबरोबर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर पोहोचले. त्याच्या पाठोपाठ रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लार्वो रियाधमध्ये पोहोचल्यानंतर लागलीच सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री फैझल बिन फरहान अल् सौद यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प आणि ब्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरील संवादानंतर केवळ पंधरा दिवसांच्या अंतराने रशिया आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली. उभय पक्षांनी युद्धावर तोडगा काढणारी ही बैठक सकारात्मक झाल्याचे स्पष्ट केले. मात्र या बैठकीसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की व युरोपियन देशांना दूर ठेवले.
दोन महासत्तांचे परराष्ट्रमंत्री रियाधमध्ये चर्चा करण्यास गुंतलेले असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे सौदी अरेबियाचे शेजारी राष्ट्र संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाले होते. मात्र त्यांना शेवटपर्यंत या बैठकीसाठी बोलावण्यात आले नाही. दुसरीकडे फेब्रुवारी 2022 पासून अमेरिकेच्या सूरात सूर मिळवून रशियाच्या विरोधात कट कारस्थाने करणारे युरोपियन देश खजिल झाले आहेत. युरोपला या बैठकीचा गंधही लागू दिला नाही. अमेरिका अन् रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट झाल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपियन युनियनची आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत केवळ अमेरिकेच्या मनमानीपणावर चर्चा करण्याव्यतिरिक्त कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनविरोधात युद्ध सुरु केल्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युरोपियन देशांनी युक्रेनला अर्थ आणि शस्त्र साहाय्य सुरु केले. अमेरिकेने आवाहन केल्याप्रमाणे रशियावर बहिष्काराचे सत्र आरंभले. रशियाकडील नैसर्गिक वायू आणि इंधन खरेदी बंद केली. तसेच अनेक प्रकारच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला. रशियन सरकारने अमेरिकन व युरोपियन वस्तूंवर बंदी लादली. आपल्या जनतेसाठी व्होकल फॉर लोकलची व्यवस्था अंमलात आणली. परिणामी अमेरिकेला वर्षाकाठी 300 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. तसेच मागील तीन वर्षांत रशियातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली. बहिष्काराचा सर्वाधिक फटका बसला तो युरोपियन युनियन आणि युक्रेनला. अमेरिकेच्या भरवशावर आंधळेपणाने रशिया विरोधात वाटचाल करणारे युरोपियन देशांना आपण पुरते फसले गेल्याचे आता जाणवू लागले.
जर्मनीतील म्युनिच येथे 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या सुरक्षा परिषदेत युरोपियन युनियनमधील नाटो सदस्य देश एकत्रित आले असता झेलेन्स्की यांनी सर्व युरोपियन देशांनी आपल्या सुरक्षेसाठी आता पुन्हा एकदा शस्त्रसाठा जमा करण्याची वेळ आल्याचे सांगितले. अमेरिकेच्या भरवशावर युरोपची सुरक्षा होणे कठिण असल्याचे त्यांनी मागील आठवड्यात स्पष्ट केले होते. अमेरिका आणि नाटो संघटनेच्या बळावर युरोपियन युनियनमधील डझनभर देशांनी निशस्त्रीकरणाचा अंगिकार करत शस्त्रसाठा बाळगणे सोडून दिले आहे. युक्रेन सरकारनेही निशस्त्रीकरण अंमलात आणल्याचा परिणाम हा देश भोगत आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आता युरोपियन देश वारंवार बैठकांचे आयोजन करत आहेत. एकूणच युरोपियन देशांत गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली आहे. त्यात अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोमधून बाहेर पडण्याचा इरादा व्यक्त केला आहे. तसेच डेन्मार्कच्या ताब्यात असलेले ग्रिनलँड मिळविण्याचा प्रयत्नही ट्रम्प करत आहेत.
रशियाबरोबर चर्चा करण्यासाठी पुढाकार घेताना ट्रम्प यांनी बायडेन शासन काळात दुखावल्या गेलेल्या सौदी अरेबियाला जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्रध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदी अरेबियाचे शत्रू राष्ट्र असलेल्या कतारला महत्त्व दिले होते. नव्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी युवराज महंमद बिन सलमान यांना जवळ केले आहे. त्यासाठीच अमेरिका आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची पहिली चर्चा सौदी अरेबियात घेण्यात आली.
प्रशांत कामत