झेलेन्स्की पुतीनसोबत चर्चा करण्यास राजी
वृत्तसंस्था/ कीव
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संघर्षाला जवळपास तीन वर्षे पूर्ण होत येत असतानाच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतलेली दिसत आहे. झेलेन्स्की यांनी नुकत्याच एका यु-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रशियन अध्यक्षांसोबत चर्चेची तयारी दर्शविल्याचे समजते. युद्ध संपवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. तसेच जर आपण संवादाकडे वाटचाल केली तर अमेरिका, युरोप, युक्रेन आणि रशियाने त्यात सहभागी होणे आवश्यक असल्याची अपेक्षाही व्यक्त केली. मात्र, आम्ही युक्रेनियन भूमीवर रशियाचा कब्जा मान्य करणार नसल्याचेही सांगितले.
तीन वर्षांपासून युद्धाच्या आघाड्यांवर रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे युक्रेनियन राष्ट्रपतींचे म्हणणे आहे. पण युक्रेनमध्ये शांतता आणण्याचा संवाद हा एकमेव मार्ग असेल तर आपला देश निश्चितच तो स्वीकारला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाला लवकरच तीन वर्षे पूर्ण होणार आहेत.
या युद्धात आतापर्यंत 45,100 युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत. तर 3.90 लाख सैनिक जखमी झाले आहेत, अशी सर्वसाधारण आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.