शिक्षकाच्या मागणीसाठी झाराप-कामळेवीर शाळेत पालकांचे शाळा बंद आंदोलन
या शाळेची एकूण पटसंख्या ९८ असून, शाळेसाठी पाच शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, नियमित पदवीधर शिक्षिका अनघा अनिल निरवडेकर यांची सावंतवाडी तालुक्यातील शाळा क्रमांक ४ येथे कामगिरीवर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी वालावल-बाधकोंड शाळेतील पदवीधर शिक्षक आशिष झणझणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांचेही कोणतीही पूर्वकल्पना न देता गोठोस शाळेत समायोजन करण्यात आल्याचे पालकांनी सांगितले.
सध्या झाराप-कामळेवीर शाळेत केवळ एक पदवीधर शिक्षक कार्यरत असून, त्यांच्याकडे मुख्याध्यापकपदाचाही कार्यभार आहे. शाळा सेमी इंग्रजी माध्यमाची असून, इयत्ता सहावी आणि सातवीतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ३७ आहे. विज्ञान विषयासाठी पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली.
यापूर्वी पालकांनी शिक्षण विभागाला लेखी निवेदन देऊन मंगळवारपर्यंत शिक्षक उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांसह शाळा बंद आंदोलन आणि दिवसभर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, या मागणीची दखल न घेतल्याने शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विज्ञान विषयाच्या पदवीधर शिक्षकाची तत्काळ नियुक्ती करावी, अन्यथा अनिश्चित काळासाठी शाळा बंद आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी दिला आहे.
