झाकीर हुसेन अन् कोल्हापुरची हलगी !
कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी :
ज्या नाजूक बोटांनी झाकीर हुसेन जी तबल्यातून चपखलतेने सुर उमटवत त्याच नाजूक बोटातून त्यांनी चक्क हलगीचा कडकडाटही उमटवला होता . आणि त्यांच्या जोडीला कोल्हापूरचा हलगी वादक संजय आवळे होता .आज झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर आवळे कुटुंबीयात ही आठवण पुन्हा जागी झाली . आणि ते व त्यांच्या सहक्रायांनी आज त्यांच्या यल्लमा देवळा जवळच्या घरात झाकीरजींना वंदन करून आदरांजली वाहिली .
नऊ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग हलगी वादक संजय आवळे यांच्या आजही स्मरणात आहे . झाकीर हुसेन यांच्या निधनाचे वृत्त त्यांनी सोमवारी ऐकले आणि ते गलबलून गेले . 'तरुण भारत संवाद' शी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले ,आम्ही हलगी वादक म्हणजे मोठ्या लोकांच्या दृष्टीने अगदी किरकोळ कलाकार .पण एक कलाकारच दुस्रया कलाकाराचे कसब जाणू शकतो. कोल्हापुरात झाकीर हुसेन यांचा एक कार्यक्रम होता . त्यासाठी ते आले होते . त्यावेळी त्यांचे स्वागत हलगीच्या कडकडाटात केले होते ‘ मी हलगी वाजवत होतो . एरवी कोण हलगी वाजवतो त्याच्याकडे स्वागत स्वीकारणारा कधी पहातही नाही . पण झाकीर हुसेन थांबले माझे हलगी वादन ऐकले. व्वा म्हणत कार्यक्रमाला निघून गेले. नंतर त्यांनी माझी माहिती घेतली . चार-पाच वाक्यच फक्त माझ्याशी ते बोलले .
एक वर्षाने एक निमंत्रण पत्रिका माझ्या पत्त्यावर आली . त्यात मुंबईला पृथ्वी थिएटर्समध्ये एक कार्यक्रम होता . कपूर कुटुंबीयांनी त्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मला देण्यात आले होते . व त्या कार्यक्रमात तुम्ही हलगी वाजवायची असा झाकीर हुसेनजींचा निरोप होता . 28 फेब्रुवारी 2016 चा हा प्रसंग .मी माझ्या सहक्रायांसह मुंबईत गेलो पृथ्वी थिएटर्स मध्ये पोहोचलो . आमची राहण्याची खूप चांगली सोय केली होती . तोपर्यंत झाकीर हुसेन यांचा आमच्याशी संपर्क नव्हता . त्यांनी आमच्यासाठी नेमलेली व्यक्ती आमची सारी विचारपूस करत होती .
सायंकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही गेलो . तेथे गेल्यावर झाकीर हुसेन यांनी ठसंजू तुम हलगी बजाना और हर एक गेस्ट का स्वागत करनाठ असे प्रेमपूर्वक हक्कानेच सांगितले. काही वेळात एकेक प्रमुख पाहुणा येऊ लागला .आणि कोल्हापुरी हलगीचा कडकडाट पृथ्वी थिएटर च्या परिसरात घुमू लागला . या अनोख्या स्वागताने लोक भारावले . टाळ्या वाजवू लागले .मुख्य कार्यक्रम झाला . आणि त्यानंतर आम्हाला झाकीरजींनी स्टेजवर बोलावून घेतले .आम्ही कोल्हापूरची भेट म्हणून एक हलगी झाकीरजींना दिली .त्यांनी ती हलगी हातात घेतली . त्यावर त्यांनी लिलया बोटे फिरवली . आणि त्या बोटाच्या जादूने जणू हलगीच कडकडू लागली . त्यानंतर मी हलगी वाजवत राहिलो आणि तबल्यावर झाकीरजी अशी काही क्षण जुगलबंदी झाली .आम्ही अक्षरश: धन्य होऊन गेलो. पण त्यानंतर आमच्या येण्या जाण्याची सारी सोय झाकीरजींनी केली .चांगली बिदागी दिली . पण त्यांच्यासोबत हलगी वा जवण्याची मिळालेली संधी हीच आमच्या आयुष्यातली मोठी कमाई ठरली.