For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवा क्रिकेटपटूंना करणार झहीर, हरभजन मार्गदर्शन

06:03 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
युवा क्रिकेटपटूंना करणार झहीर  हरभजन मार्गदर्शन
Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

Advertisement

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि जागतिक दर्जाचे गोलंदाज झहीर खान आणि हरभजन सिंग हे आता बेंगळूरच्या बीसीसीआयच्या क्रिकेट अकादमीमध्ये युवा क्रिकेटपटूंसाठी खास मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय क्रिकेट क्षेत्राला नव्या युवा क्रिकेटपटूंची पिढी उपलब्ध करुन देण्यासाठी आतापासूनच माजी क्रिकेटपटूंनी खास मोहीम हाती घेतली आहे.

बेंगळूरच्या बीसीसीआयच्या क्रिकेट अकादमीची सर्व सुत्रे माजी कसोटीवीर व्ही. व्ही. एस. लक्ष्मणकडे आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये नवी युवा पिढी तयार करण्याकरिता व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने झहीर खान, हरभजन सिंग आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्याशी चर्चा केली.या सराव शिबिरामध्ये आता बीसीसीआयकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील युवा क्रिकेटपटूंची निवड केली जाईल. प्रथमश्रेणी क्रिकेट स्तरावरील विविध वयोगटातील भारत अ संघाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचाही या सराव शिबिरासाठी विचार केला जाणार आहे. भारताचा माजी वेगवान डावखुरा गोलंदाज झहीर खानचा मुक्काम बेंगळूरमध्ये यापूर्वीच सुरू असून त्याने पाच दिवसांचे सराव शिबिरही घेतले आहे. या शिबिरात भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी युवा वेगवान गोलंदाजांचा समावेश होता. फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे हे फिरकी गोलंदाजीसाठी पाच दिवसांचे शिबिर घेण्याचा विचार करीत आहेत. भारतातर्फे कसोटी आणि वनडेमध्ये सर्वाधिक बळी नोंदविण्याचा पराक्रम अनिल कुंबळेने यापूर्वी केला आहे.

Advertisement

2026 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयच्या अकादमीमध्ये युवा क्रिकेटपटूंसाठी सराव शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. भारतीय क्रिकेट क्षेत्रातील कुशल प्रशासक तसेच बीसीसीआयचे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष दिवंगत जगमोहन दालमिया यांच्या कालावधीपासूनच बेंगळूरच्या क्रिकेट अकादमीमध्ये खास सराव शिबिरे आयोजित करण्याची प्रथा सुरू झाली होती आणि या शिबिरात क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक दर्जाच्या क्रिकेटपटूंना निमंत्रित केले जात होते. भारताचे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे, इरापल्ली प्रसन्ना, सैयद किरमानी यांनी विविध विभागीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण सराव शिबिरे आयोजित केली होती.

Advertisement
Tags :

.